बांगलादेशात ‘जुलै विद्रोह संग्रहालय’ सुरू
पंतप्रधान तारिक रहमान यांच्या हस्ते उद्घाटन
ढाका : पंतप्रधान तारिक रहमान यांनी बुधवारी ‘जुलै मास अपरायजिंग मेमोरियल संग्रहालया’चे उद्घाटन केले आहे. हे संग्रहालय 2024 च्या जुलै मास अपरायजिंग (जन-विद्रोह)च्या इतिहासाचे जतन अन् यात जीव गमावलेले लोक तसेच लढणाऱ्या लोकांच्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. शेर-ए-बांग्ला नगर येथील गणभवनला औपचारिक स्वरुपात संग्रहालयात रुपांतरित करण्यात आले आहे. गणभवन हे पूर्वी माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे अधिकृत निवासस्थान होते. हे संग्रहालय आता लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्यात एक माहितीपट दाखविण्यात आला, ज्यात जुलैचा जन-विद्रोहाचा घटनाक्रम, सर्व क्षेत्रांच्या लोकांची भागीदारी, त्याग अन् आंदोलनाला यशस्वी करणाऱ्या घटना दाखविण्यात आल्या आहेत. 5 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात झालेल्या जन-विद्रोहादरम्यान शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. तर हजारो निदर्शक गणभवन परिसरात दाखल झाले होते. त्याच्या तीन दिवसांनी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने कामकाज सांभाळले आणि नंतर गणभवनाला सुरक्षित ठेवणे अन् संग्रहालयात रुपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.