जुलानीला दहशतवाद्यांच्या यादीतून वगळले
अमेरिकेचा महत्त्वाचा निर्णय : 85 कोटीचे होते इनाम : सीरियात पोहोचले अमेरिकेचे अधिकारी
वृत्तसंस्था/ दमास्कस
अमेरिकेसाठी सीरियातील बंडखोर गट तहरीर अल शामचा (एचटीएस) प्रमुख अबु मोहम्मद अल जुलानी आता दहशतवादी राहिलेला नाही. अमेरिकेच्या प्रशासनाने जुलानीवर ठेवण्यात आलेले 10 दशलक्ष डॉलर्सचे (85 कोटी रुपये) इनाम हटविले आहे. सीरियात एचटीस नेत्यांसोबत बैठकीनंतर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष बसर अल-असाद यांना सत्तेवरून हटविण्यात आल्यावर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या सहाय्यक विदेशमंत्री बार्बरा लीफ यांनी दिली आहे.
असद यांच्या पलायनानंतर अमेरिकेचे एक पथक सीरियात पोहोचले आहे. याचे नेतृत्व बार्बरा लीफ करत आहेत. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी जुलानीचीही भेट घेतली आहे. एचटीएस नेत्यांसोबतची चर्चा अत्यंत यशस्वी राहिली असल्याचा दावा बार्बरा लीफ यांनी केला आहे.
अमेरिकेने 2018 मध्ये एचटीएला दहशतवादी संघटना घोषित पेले होते. त्यापूर्वी अबू जुलानीच्या विरोधात इनाम जाहीर करण्यात आले होते. अमेरिका आता एचटीएस गटाला दहशतवादी संघटनांच्या यादीतून हटविण्यावरही विचार करत आहे.
सीरियाशी वाढती जवळीक
तुर्कियेने सीरियाला पूर्णपणे नियंत्रित करू नये अशी इच्छा अमेरिकेच्या प्रशासनाची आहे. तुर्कियेचे अध्यक्ष एर्दोगान दीर्घकाळापासून सीरियातील असाद सरकारचे पतन करण्यासाठी प्रयत्नशील होते आणि यात त्यांना यश मिळाले आहे. आता याचा लाभ उचलण्याचा प्रयत्न एर्दोगान करत आहेत. याचबरोबर सीरियात इराणने पुन्हा स्वत:ची स्थिती मजबूत करू नये म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे. अमेरिका थेट एचटीएसच्या संपर्कात आहे. एचटीएसने अल-कायदापासून धडा घ्यावा. एचटीएस सीरियाला पुढे नेऊ इच्छित असल्यास त्याला धार्मिक कट्टरतेचा त्याग करावा लागेल असा इशारा अमेरिकेचे विदेशमंत्री अँटोनी ब्लिंकेन यांनी दिला होता.
जुलानीचे युवतीसोबत छायाचित्र
याचदरम्यान एचटीएस नेता जुलानीने एका मुलीसोबत छायाचित्र काढल्याने टीका सुरू झाली आहे. लिया खैरल्लाह नावाच्या मुलीने 10 डिसेंबर रोजी जुलानीसोबत छायाचित्र काढून घेतले होते. छायाचित्रणापूर्वी जुलानीने मुलीला डोकं झाकून घेण्यास सांगितले होते. आता यावरूनच त्याच्यावर टीका होत आहे. अशाप्रकारच्या घटना सीरियात इस्लामिक व्यवस्था लादण्यात येणार असल्याचा संकेत देत असल्याचा दावा टीकाकार करत आहेत. दुसरीकडे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी 17 डिसेंबर रोजी जुलानी यांची भेट घेतली होती. यावेळी ब्रिटिश महिला अधिकाऱ्याने स्वत:चे डोकं झाकून घेतले नव्हते. यामुळे देखील जुलानीला कट्टरवाद्यांनी लक्ष्य केले होते.