For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News : जुईली दळवींच्या माघारीने तटकरेंना दिलासा 

12:56 PM Jun 04, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ratnagiri news   जुईली दळवींच्या माघारीने तटकरेंना दिलासा 
Advertisement
रत्नागिरी : विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीसाठी चिंतेचा विषय ठरलेली बंडखोरी अखेर शमली आहे. शिवसेना शिंदे गटातील अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी (जुईकर) यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज बुधवारी मागे घेतला.
दळवी यांच्या माघारीने महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोकण विधानपरिषद निवडणूक महायुतीतील नेत्यांची यशस्वी शिष्टाई विधानपरिषदेसाठी जुईली दळवी यांनी दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात अस्वस्थता निर्माण झाली होती.
परंतु महायुतीतील नेत्यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर जुईली दळवी यांनी रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.  बुधवारी दुपारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात ही कायदेशीर प्रक्रिया पार पडली. जुईली दळवी यांच्यावतीने त्यांचे अधिकृत सूचक विघ्नेश माळी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.  
अंतिम चित्र आज स्पष्ट होणार
कोकण विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे अनिकेत तटकरे विरुध्द महाविकास आघाडीचे बाळ माने असा सामना रंगणार आहे. परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या ॲड. मानसी म्हात्रे यांच्यासह अन्य अपक्ष उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरू शकते. आज, गुरुवार ४ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे दुपारनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
विकास गोगावले यांची उपस्थिती लक्षवेधी 
अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेवेळी महायुतीमधील समन्वय स्पष्टपणे दिसून आला. आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून या संपूर्ण प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवले.
महायुतीमधील एकी आणि शिस्त दाखवण्यासाठी त्यांची ही उपस्थिती लक्षवेधी ठरली. या घडामोडींमुळे विरोधकांच्या गोटात मात्र शांतता पसरली आहे. महायुती आता अधिक ताकदीने प्रचारात उतरणार असल्याचे सांगण्यात आले. 
पालकमंत्री पदाबाबत भाष्य करणे योग्य नाही - विकास गोगावले 
या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना विकास गोगावले म्हणाले, आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आल्यानंतर आम्ही या प्रक्रियेत सक्रिय झालो. आम्ही पक्षाच्या आदेशाचे पालन करणारे कार्यकर्ते आहोत. पक्षाच्या बैठकीत झालेला तोडगा सर्वांना मान्य आहे.
यापूर्वी लोकसभा निवडणुकीत आम्ही सुनील तटकरे यांच्यासाठी प्रामाणिक काम करून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले होते. हे राजकारण आहे. त्यात चढ-उतार होत असतात, मात्र आता आम्ही एकजुटीने अनिकेत तटकरेंच्या पाठीशी आहोत, असे गोगावलेंनी स्पष्ट केले.
दरम्यान, दळवी यांच्या माघारीमुळे मंत्री भरत गोगावले यांचा रायगड पालकमंत्री पदाचा मार्ग आता मोकळा झाला का, असे विचारले असता, पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही, असेही गोगावले यांनी सांगितले.
Advertisement
Advertisement
Tags :

.