For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी : सरदेसाई

07:23 AM Oct 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी   सरदेसाई
Advertisement

प्रतिनिधी/ मडगाव

Advertisement

एसटी कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी इस्पितळातून जाऊ दिल्यानंतर केलेल्या विधानात मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांचा त्यांच्यावरील हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप केला आहे. हा आरोप गंभीर असून त्याची सखोल चौकशी व्हायला हवी. रामा यांनी या प्राणघातक हल्लाप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या एक सदस्यीय समितीमार्फत न्यायिक चौकशी व्हावी अशी जी मागणी केलेली आहे ती एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्याला बरोबर वाटते, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी जारी केलेल्या व्हिडिओतून म्हटले आहे.

कारण आज रामा काणकोणकर यांच्या बाबतीत जे घडले ते उद्या आम्हा कुणाच्याही बाबतीत घडू शकते व त्यातून गुंडाराज स्थापित होऊ शकते. भाजपचे गुंडाराज आम्ही कुठल्याच प्रकारे निर्माण होऊ देता कामा नये, असे सरदेसाई यांनी पुढे म्हटले आहे. तपासादरम्यान आम्हाला कुणावर तरी विश्वास ठेवावा लागेल. पण रामा यांनी पोलिसांवर त्यांचा विश्वास नसल्याचे म्हटले आहे. जर पोलिस नीट तपास करणार नसतील, तर मग आणखी कोण तपास करणार ? जर पोलिस दबावाखाली येत असतील, तर ‘गोवा अगेन्स्ट गुंडाराज’च्या बॅनरखाली ज्या प्रकारे राजकीय पक्ष एकत्र आले होते त्या प्रकारे सर्वांनी एकत्र येऊन आणि बैठक घेऊन योग्य पाऊल उचलायला हवे, असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले.

Advertisement

मी रामा यांच्या प्रकृतीत झालेली सुधारणा आणि त्यांच्या धाडसाचे स्वागत करतो. परंतु त्यांच्या विधानांमध्ये सातत्य सुनिश्चित करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. प्रथम पोलिस आणि आता माध्यमांसमोर केलेले खुलासे लवकर का समोर आले नाहीत हे लोक जाणून घेण्यास पात्र आहेत. संपूर्ण सत्य उघड करण्यासाठी आपण एका विश्वासार्ह तपास संस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण गोव्याला परवडणारे नाही. ‘गोवा अगेन्स्ट गुंडराज’ व्यासपीठाचा भाग म्हणून मला वाटते की, आम्हा सर्वांनी एकत्र येण्याची, विचार करण्याची आणि एकत्रित भूमिका घेण्याची वेळ आली आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.