रोशन रेडकरच्या अटकपूर्व जामिनावरील निवाडा राखून
पणजी : हडफडे-नागवे ग्राम पंचायतीचा अपात्र सरपंच रोशन रेडकर याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राखून ठेवला आहे. रोशन रेडकर याने म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन फेटाळण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या न्या. आशिष चव्हाण यांच्या खंडपीठासमोर आठ दिवसाहून अधिक काळ या याचिकेवर सुनावणी सुऊ आहे. सोमवारी दोन्ही पक्षकारांच्या वकिलांनी आपल्या बाजू मांडल्यावर न्यायाधीशांनी आपला निकाल राखून ठेवला. हणजूण पोलिसांनी फरारी असलेल्या बागकर याला शुक्रवारी अटक करण्यात यश मिळवले असून त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बिजय कुमारचा जामिनासाठी अर्ज
हडफडे येथील ‘बर्च नाईट क्लब’ आग दुर्घटनाप्रकरणी क्लबचा ऑपरेशनल मॅनेजर संशयित बिजय कुमार सिंग याची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. दुर्घटनेवेळी आपल्या अशीलानेच स्वत:हून अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली होती. आईचे मुंबईमध्ये आजारपणामुळे निधन झाल्याने आपला अशील गोव्यातून गेला होता. त्यामुळे तो पळून गेला या पोलिसांच्या दाव्यामध्ये तथ्य नसल्याचे संशयिताच्या वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. बिजय कुमार सिंग याने म्हापसा जिल्हा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासमोर जामीन अर्ज सादर केला असून त्यावर गुऊवार, 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.