निवृत्तीनंतर न्यायाधीशाने दिले 9 निर्णय
सर्वोच्च न्यायालयही अवाक् : मागविला अहवाल
►वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मद्रास उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने निवृत्तीनंतर निर्णय दिले आहेत, याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाने अहवाल मागविला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश टे. माथीवनन यांचे विस्तृत निर्णय त्यांच्या निवृत्तीनंतरच उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर जारी झाले आहेत. यावरून सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत अहवाल मागविला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडून पूर्ण माहिती मागविली आहे. अखेर संबंधित प्रकरणाचा एका ओळीचा निर्णय कधी देण्यात आला आणि यानंतर विस्तृत निर्णय कधी अपलोड करण्यात आला अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
न्यायाधीश माथीवनन यांच्या वर्तनावरून पहिल्यांदाच प्रश्न उपस्थित झालेले नाहीत. माथीवनन हे मे 2017 मध्ये निवृत्त झाले हेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश माथीवनन यांच्या एका निर्णयाला रद्द केले होते. माथीवनन यांन दिलेल्या निर्णयाची विस्तृत प्रत वेबसाइटवर त्यांच्या निवृत्तीच्या 5 महिन्यांनी अपलोड करण्यात आली होती, यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला होता.
न्यायाधीश माथीवनन यांचे सुमारे 9 निर्णय त्यांच्या निवृत्तीनंतर अपलोड करण्यात आल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला सोमवारी देण्यात आली. या प्रकरणी दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेत उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारला नोटीस जारी केली आहे. अखेर असे का घडले, निर्णयांची प्रारंभिक प्रत कधी जारी करण्यात आली आणि विस्तृत निर्णय कधी जारी झाले अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून अशा 9 प्रकरणांरवून कुठला प्रशासकीय आदेश जारी करण्यात आला होता का अशी विचारणाही खंडपीठाने केली आहे.