‘जेएसडब्ल्यू’चा आयपीओसाठी सेबीकडे अर्ज
4 हजार कोटी उभारणार : सिमेंट उत्पादनात करणार वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी जेएसडब्ल्यू सिमेंट आपला आयपीओ सादर करणार असून यासंदर्भातला रीतसर अर्ज कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे नुकताच सादर केला आहे. या आयपीओ अंतर्गत कंपनी येणाऱ्या काळामध्ये 4 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे.
जेएसडब्ल्यू समूहातील आणखीन एक कंपनी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर यांनी मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये 2800 कोटी रुपयांचा आयपीओ लॉन्च केला होता. ऑगस्ट 2021 मध्ये नुवोको विस्टास यांच्या माध्यमातून 5000 कोटी रुपयांचा आयपीओ सादर केल्यानंतर सिमेंट क्षेत्रामधील पहिला आयपीओ कंपनी लॉन्च करत आहे.
या आयपीओअंतर्गत कंपनी 2 हजार कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर करणार असून त्याचप्रमाणे तेवढ्याच किमतीचे समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर करणार आहे अशीही माहिती मिळते आहे.
जेएसडब्ल्यू सिमेंट कंपनीने आपल्या उत्पादन क्षमतेत अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी वाढ केलेली आहे. गेल्या चार वर्षामागे 20.60 दशलक्ष टन इतकी सिमेंट उत्पादन क्षमता कंपनीची होती, जी वाढून 60 दशलक्ष टन प्रतिवर्ष इतकी करण्याची योजना बनवण्यात आली आहे. कंपनी उत्तर आणि मध्य भारतामध्ये विविध शहरांमध्ये व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.