जेएसडब्ल्यू-फोक्सवॅगन भारतात
ईव्ही उत्पादन सुरु करण्याच्या तयारीत , दोन्ही कंपन्यांमध्ये संयुक्त उपक्रमासाठी बोलणी सुरु
मुंबई :
जेएसडब्ल्यू ग्रुप आणि फोक्सवॅगन ग्रुप इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करणार आहेत. भारतात लवकरच ई.व्ही. उत्पादन घेण्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये संयुक्त उपक्रम सुरु करण्याबाबत बोलणी सुरू आहे. वृत्तानुसार, या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये चर्चा सुरू झाली होती.
जेएसडब्ल्यू समूहाने अलीकडेच ओडिशा सरकारसोबत 40,000 कोटी रुपयांच्या अंदाजे गुंतवणुकीसह भागीदारी केली आहे. या अंतर्गत कटक आणि पारादीपमध्ये एकात्मिक ईव्ही आणि बॅटरी निर्मिती प्रकल्प सुरू करण्याची योजना आहे.
फोक्सवॅगन विकणार भागभांडवल
फोक्सवॅगन आपल्या भारतीय उपकंपनीतील भागभांडवल विकणार आहे. वृत्तानुसार, फोक्सवॅगन आपली भारतीय उपकंपनी स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियामधील हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. जर्मन ऑटो दिग्गज ईव्हीएस बनवण्यासाठी भारतातील आणखी एका ऑटोमेकरसोबत भागीदारी करण्याच्या तयारीत आहे.
जेएसडब्ल्यूच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘आम्ही बाजारातील अफवा आणि अनुमानांवर भाष्य करणे टाळतो. ‘याशिवाय या वृत्ताबाबत फोक्सवॅगन ग्रुपकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. डिसेंबरमध्ये, जेएसडब्ल्यू आणि एमजीमोटर इंडियाने ईव्ही विकसित करण्यास सहमती दर्शवली आहे.