जेएसडब्ल्यू स्टील जगात ठरली भारी, भांडवल मूल्यात अग्रेसर
कोलकाता :
पोलाद क्षेत्रातील कंपनी जेएसडब्ल्यू स्टील ही जगातील आघाडीवरची पोलाद कंपनी बनली आहे. 2025 मध्ये कंपनीचा समभाग 18 टक्के इतका वाढला आहे. कंपनीने अलीकडेच पोलाद क्षेत्रातील दिग्गज कंपनी अर्सेलर मित्तल आणि न्यूकोअर कॉर्प यांना मागे टाकले आहे. जेएसडब्ल्यू स्टीलचे बाजार भांडवल मूल्य 30.31 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. विजयनगर, डोलवी आणि सलेम या ठिकाणी कंपनीचे प्लांट असून अमेरिका आणि इटलीतही कंपनी कार्यरत आहे. कंपनीची सध्याची पोलाद उत्पादन क्षमता 35.7 दशलक्ष टन इतकी आहे. आगामी काळामध्ये म्हणजेच आर्थिक वर्ष 2028 पर्यंत 43.5 दशलक्ष टन आणि आर्थिक वर्ष 2031 पर्यंत 51.5 दशलक्ष टन इतक्या क्षमतेपर्यंत पोहोचण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे.
काय म्हणाले पार्थ जिंदल
जेएसडब्ल्यूचे पार्थ जिंदल यांनी एक्सवर बाजार भांडवलाच्या बाबतीमध्ये जगातील सर्वात मोठी पोलाद कंपनी बनल्याचे म्हटले आहे. यामध्ये कुटुंबातील सदस्यांची मेहनत कामाला आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जेएसडब्ल्यू स्टील ही कंपनी देशामध्ये पाहता बाजार भांडवलाच्या बाबतीत टाटा स्टीलच्याही पुढे आहे. 1982 मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती. या कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे.