जेएसडब्ल्यू-पॉस्को यांची हातमिळवणी
बॅटरी मटेरियल-अक्षय ऊर्जा क्षेत्रासाठी एकत्र
नवी दिल्ली :
जेएसडब्ल्यू समूह आणि दक्षिण कोरियाची पॉस्को यांनी भारतातील स्टील प्लांट आणि बॅटरी मटेरियलवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हातमिळवणी केली आहे.
जेएसडब्ल्यू समूहाने मंगळवारी दक्षिण कोरियास्थित पॉस्को समूहासोबत भारतात 5 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी आणि बॅटरी मटेरियल आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील संधींबाबत एकत्रित काम करण्याचे निश्चित केले आहे.
जेएसडब्ल्यू समूहाने पॉस्को समूहासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामध्ये भारतातील पोलाद, बॅटरी सामग्री आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याची रूपरेषा दर्शविली आहे,’ जेएसडब्ल्यू समूहाने एका निवेदनात म्हटले आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि प्रस्तावित एकात्मिक स्टील प्लांटशी संबंधित बॅटरी सामग्रीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन्ही पक्ष अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्याच्या शक्यतांचा शोध घेतील, असे निवेदनात म्हटले आहे.
जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल म्हणाले, ‘पॉस्कोसोबतचा हा सामंजस्य करार भारतीय पोलाद उद्योगात योगदान देण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून, भारत सतत वाढीसाठी प्रचंड संधी उपलब्ध करून देतो आणि पॉस्को सोबतची आमची भागीदारी जेसीडब्ल्यूच्या या योजनेला चालना देण्याच्या वचनबद्धतेला बळ देते.’