जेएसडब्ल्यू पेंट्सची अक्झो नोबल इंडिया या कंपनीमध्ये मोठी हिस्सेदारी
वृत्तसंस्था/ कोलकाता
भारतीय अब्जाधीश उद्योगपती सज्जन जिंदल यांची कंपनी जेएसडब्ल्यू पेंट्स यांनी अलीकडेच अक्झो नोबल इंडिया या कंपनीमध्ये मोठी हिस्सेदारी खरेदी करण्याचा विचार केला आहे. हा खरेदीचा व्यवहार 8986 कोटी रुपयांचा असणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जेएसडब्ल्यू पेंट्स अक्झो नोबल इंडिया मध्ये 74.76 टक्के इतकी हिस्सेदारी खरेदी करणार आहे.
सदरचा खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर जेएसडब्ल्यूकडे जगातील प्रसिद्ध अशा ड्युलक्स हा ब्रँड सामील होणार आहे. भारतामधील रंग उद्योगांमधला हा सर्वात मोठा खरेदी व्यवहार असल्याचे मानले जात आहे. या खरेदी व्यवहारानंतर जेएसडब्ल्यू पेंटची स्थिती अधिक मजबूत होणार असून ही कंपनी आता बाजारातील इतर स्पर्धक रंग उत्पादक कंपन्या एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स आणि आदित्य बिर्ला समूह यांच्याशी टक्कर देऊ शकणार आहे.
कधीपासून अस्तित्वात
जेएसडब्ल्यू पेंटस्ची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. समूहाची 23 अब्ज डॉलर्सची ही रंगकंपनी असून पोलाद, सिमेंट, ऊर्जा, पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये समूहाने आपला विस्तार केला आहे.
काय म्हणाले एमडी
जेएसडब्ल्यू पेंटस्चे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदल म्हणाले की पेंट्स आणि कोटिंग्स ही दोन क्षेत्रे भारतामध्ये सर्वाधिक तेजीने वाढणारी आहेत. ड्युलक्स हा ब्रँड घेतल्यानंतर जेएसडब्ल्यू भविष्यातील आघाडीवरची रंग कंपनी म्हणून बनण्यासाठी प्रयत्न करणार आहे.