जेएसडब्ल्यू एमजी इलेक्ट्रीक वाहन विक्रीत दुसऱ्या स्थानी
टाटा मोटर्स पहिल्या स्थानी : एमजी वाहनांना वाढतोय प्रतिसाद
कोलकाता :
इलेक्ट्रीक लक्झरी कारच्या स्पर्धेत जेएसडब्ल्यू एमजी मोटर्स कंपनीची कामगिरी स्पृहणीय राहिली आहे. सप्टेंबरमधील इलेक्ट्रीक कारच्या विक्रीचा आढावा घेतला असता पहिल्या क्रमांकावर टाटा मोटर्स ही कंपनी राहिली आहे. भारतात लक्झरी इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत जेएसडब्ल्यू एमजी कंपनी चांगल्या कामगिरीसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. कंपनीच्या कार विक्रीत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झालीय.
या कार्स लोकप्रिय
सप्टेंबरमधील विक्रीच्या आकडेवारीनुसार एमजी सायबरस्टर आणि एमजी-9 प्रेसिडेंशियल लिमोझीन या दोन कारचा वाटा महत्त्वाचा राहिला. या दोन्ही वाहनांच्या मागणीमध्ये ग्राहकांनी वाढ नोंदविली आहे. या वाहनांच्या खरेदीदारांना 3 ते 4 महिने प्रतिक्षा करावी लागत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जुलै 2025 मध्ये एमजी सायबरस्टर वाहनाचे सादरीकरण केल्यानंतर 256 वाहनांची विक्री केली गेली. लक्झरी गटामध्ये कंपनीची ही देशामध्ये सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे. यायोगे जेएसडब्ल्यू एमजी मोटर्स ही दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे.
कंपनीची अनुभव केंद्रे व विक्री
कंपनीने देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये 14 अनुभव केंद्रे खास ग्राहकांसाठी सुरू केलेली आहेत. जिथे वाहनांची जास्तीत जास्त माहिती ग्राहकांना करून दिली जात आहे. फाडा या संघटनेच्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात कंपनीने 3912 वाहनांची विक्री केली आहे. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनीने 1021 वाहनांची विक्री केली होती. यंदा वाहन विक्री तीनपट वाढली आहे.
सायबरस्टरची वैशिष्ट्यो
सायबरस्टर वाहनात डुअल-मोटर ऑल व्हील ड्राईव्ह सिस्टीम असून 3.2 सेंकेदात शून्य ते 100 किलोमीटर इतका वेग प्रतितास हे वाहन घेते. सीझर डोअर, सॉफ्ट टॉप रूफ, ब्रेंबो-4 पिस्टन ब्रेक या सुविधा आहेत.