For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जुन्या कामगारांना प्रथम प्राधान्य द्या, निसर्गाचेही रक्षण करा!; जेएसडब्ल्यू खाण प्रकल्पाला सभापती गणेश गावकर यांचा अटींसह पाठिंबा

01:01 PM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
जुन्या कामगारांना प्रथम प्राधान्य द्या  निसर्गाचेही रक्षण करा   जेएसडब्ल्यू खाण प्रकल्पाला सभापती गणेश गावकर यांचा अटींसह पाठिंबा
Advertisement
 धारबांदोडा : कोडली-दाभाळ येथील पूर्वीच्या वेदांता खाण कंपनीच्या मिनरल ब्लॉक 12 चे लीज जेएसडब्ल्यू कंपनीला मिळाल्यानंतर या खाण प्रकल्पासंदर्भात गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नुकतीच जनसुनावणी घेण्यात आली. या सुनावणीवेळी उपस्थित बहुतेकांनी काही अटींवर खाणकाम सुरू करण्यास सहमती दर्शवली. स्थानिक आमदार तथा गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गावकर यांनीही खाण प्रकल्पाला पाठिंबा देताना स्थानिक रोजगार, जुन्या कामगारांचे पुनर्वसन, पर्यावरण संरक्षण आणि मतदारसंघाच्या विकासाबाबत महत्त्वाच्या मागण्या मांडल्या.

सावर्डे आणि धारबांदोडा परिसर खनिज संपत्तीने समृद्ध असून, खाण व्यवसायाने राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठे योगदान दिले आहे. मात्र, या व्यवसायाचा अपेक्षित लाभ स्थानिक जनतेपर्यंत पोहोचला नाही, ही वस्तुस्थिती आहे. खाणबंदीमुळे ट्रक मालक, कामगार आणि खाण व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे कोडली-दाभाळ खाण प्रकल्प पुन्हा सुरू होण्याच्या शक्यतेकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

सभापती डॉ. गणेश गावकर यांनी स्पष्ट केले की, जेएसडब्ल्यूच्या खाण प्रकल्पाला आपला पाठिंबा बिनशर्त नसून स्थानिकांचे हक्क, रोजगार, स्वाभिमान आणि पर्यावरणाचे संरक्षण या अटींवर आधारित आहे.

जुन्या कामगारांना रोजगारात प्रथम प्राधान्य

वेदांता कंपनीतील खाणकाम बंद झाल्यामुळे शेकडो कामगारांच्या रोजगारावर गदा आली. या कामगारांचे प्रश्न आपण विधानसभेत मांडले असून, नव्या खाण करारात पात्र आणि पुन्हा काम करण्यास इच्छुक असलेल्या जुन्या कामगारांना प्राधान्य देण्याची अट असावी, अशी मागणी आपण केली होती, असे गावकर यांनी सांगितले. जेएसडब्ल्यू कंपनीने या कामगारांना पुन्हा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

ट्रक मालकांसाठी सहकारी वाहतूक व्यवस्था

खाणबंदीमुळे अनेक स्थानिक ट्रक मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नव्याने ट्रक खरेदी करणे अनेकांना शक्य नसल्याने जेएसडब्ल्यू कंपनीने बँकांच्या सहकार्याने कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. स्वतःचा ट्रक घेणे शक्य नसलेल्या स्थानिकांना ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांमध्ये सामावून घेण्याची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सुचविले.

याशिवाय पाण्याचे टँकर, सुरक्षा व्यवस्था, कॅन्टीन आणि हरित पट्ट्याची देखभाल यांसारख्या पूरक कामांमध्ये रोजगार गमावलेल्या स्थानिकांना प्राधान्याने संधी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

पर्यावरण संरक्षणासाठी ठोस उपाययोजना हव्यात

खाण विकास करताना मानवी आरोग्य आणि निसर्गाचे नुकसान होता कामा नये, असे स्पष्ट करत गावकर यांनी पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपाय सुचविले. खनिज वाहतुकीच्या मार्गावर अत्याधुनिक धूळ प्रतिबंधक यंत्रणा उभारणे, नियमित पाण्याचा फवारा मारण्याची व्यवस्था करणे, स्थानिक शेती आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी गाळ साचू नये म्हणून आवश्यक तळी उभारणे, तसेच 377 हेक्टर परिसरात दाट हरित पट्टा विकसित करणे यावर त्यांनी भर दिला.

खाण महसूल आणि सीएसआर निधी स्थानिक विकासासाठी

खाणीतून मिळणाऱ्या महसुलाचा योग्य वाटा सावर्डे आणि धारबांदोडा मतदारसंघाच्या विकासासाठी वापरण्यात यावा, अशी मागणी गावकर यांनी केली. जेएसडब्ल्यूच्या सीएसआर निधीतून स्थानिक रस्ते, आरोग्य केंद्रे आणि शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी तरतूद करावी, असेही त्यांनी नमूद केले.

खाण प्रकल्प सुरू करताना स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य देणे, जुन्या कामगारांना पुन्हा संधी देणे, ट्रक मालकांना आर्थिक आधार उपलब्ध करून देणे आणि पर्यावरणाचे काटेकोरपणे संरक्षण करणे आवश्यक आहे. या सर्व अटींची पूर्तता झाल्यास खाण प्रकल्पातून स्थानिकांना प्रत्यक्ष लाभ मिळू शकेल, असा विश्वास सभापती डॉ. गणेश गावकर यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.