Kolhapur News: जे. पी. नाईक यांच्या कर्तृ्त्वाला सरकारचा सलाम!, सरकारने घेतली कार्याची दखल
प्राचार्यांना डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावाने आदर्श शिक्षक राज्य पुरस्कर देण्याचा निर्णय
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : कोल्हापूर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी, डॉ. जे. पी. नाईक. राज्य शासनाने राज्यातील महाविद्यालयीन शिक्षक, प्राचार्यांना डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावाने आदर्श शिक्षक राज्य पुरस्कर देण्याचा निर्णय घेतला. यातून जे. पी. नाईक यांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे.
कोल्हापुरातला सर्वात मोठ्या उलाढालीचा ताराबाई रोड हा रस्ता कोणामुळे झाला?, खंबाळा तलाव मुजवून तेथे लक्ष्मी-सरस्वती या दोन टॉकीजची उभारणी कशी झाली?, ब्रह्मपुरी टेकडीचे अधिक अभ्यासपूर्ण उत्खनन करण्यासाठी व कोल्हापूरचे प्राचीनत्व जगासमोर आणण्यासाठी कोणी पुढाकार घेतला?, वरूणतीर्थ तलावाचे रूपांतर वरूणतीर्थ मैदानात कोणी केले?
कोल्हापूरच्या विस्तारासाठी फुलेवाडी, रुईकर कॉलनीसारख्या वसाहती कोणाच्या पुढाकाराने उभ्या राहिल्या? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच म्हणजे जे. पी. नाईक हे आहे. याच जे. पी. नाईक यांच्या नावाने आता आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. नाईकांच्या नावामुळे या पुरस्काराचा सन्मानच अधिक वाढला आहे.
हे जे. पी. नाईक कोल्हापूर जिह्यातल्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडीचे. वरवर अतिशय साध्या वाटणाऱ्या नाईकांनी शहर प्रशासन क्षेत्रात अलौकिक असे काम केले, त्याचे अनुकरण पुढे राज्यभरात झाले. गारगोटी येथील मौनी विद्यापीठाचे त्यांचे काम देशात आदर्श ठरले.
प्राथमिक शिक्षणाचे केंद्र सरकारचे सल्लागार म्हणून राष्ट्रपतींच्या सहीने नियुक्ती झालेले जे. पी. नाईक यांनी या क्षेत्रात देशभरात अतुलनीय असे काम केले. पण पिकतंय तेथे विकत नाही, अशीही परिस्थिती जे. पी. नाईक यांच्या वाट्याला आली.
रिजन्सी कौन्सिलचा चिटणीस म्हणून खूप मोठे अधिकार असल्याने त्यात नाईक यांनी कोल्हापूरसाठी विकासाची खूप मोठी कामे केली. पण नव्या पिढीला त्यांच्या कामाची माहिती नाही. राज्य सरकारने आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराला त्यांचे नाव यावर्षीपासून देण्याचा निर्णय घेतला आहे आणि नव्या पिढीसमोर जे. पी. नाईक नाव पुन्हा ठळकपणे आले आहे.
साधारणपणे 1943 ते 1946 या काळात जे. पी. नाईक यांनी कोल्हापूर नगरपालिकेत मुख्य अधिकारी म्हणून काम केले. साधारणपणे अधिकारी म्हणजे वेगळे व्यक्तिमत्व असते आणि तसे ते ठेवावेही लागते. पण जे. पी. नाईक त्याला अपवाद होते. साधा स्वच्छ शर्ट, त्याखाली आघळपघळ चड्डी, खांद्यावर कापडी पिशवी, पायात साधे चप्पल आणि खिशात कायम फुटाणे किंवा शेंगदाणे ठेवून ते खात- खात कोल्हापुरात पायी भ्रमंती करत.
लोकांच्या अडचणी समजून घेत. त्यांची आपुलकीची भाषा आणि साधेपणा त्यामुळे ते 1940 च्या सुमारास कोल्हापुरात हिरो ठरले आणि त्या पात्रतेचे काम ते करून गेले. आत्ताचा महाद्वार रोडला संलग्न ताराबाई रोड 1940 पर्यंत चिंचोळा बोळ होता. त्यामुळे चारचाकी वाहनही जाऊ शकत नव्हते. या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रयत्न पूर्वी झाला होता. पण विरोधामुळे तो थांबला.
शहराची गरज म्हणून नाईक यांनी महाद्वार रोड ते रंकाळा रस्त्याचे रुंदीकरण करायचे ठरवले. घरे पाडून रस्ता रुंदीकरण आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी स्वत: रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांची बैठक घेतली. या रस्त्याचे रुंदीकरण का आवश्यक हे त्यांना समजावून सांगितले आणि या रस्त्याच्या रुंदीकरणास स्थानिकांनीच मंजुरी दिली.
16 डिसेंबर 1943 रोजी या रस्त्याच्या रुंदीकरणास सुरुवात झाली. आज ताराबाई रोड म्हणजे कोल्हापुरातल्या सर्वात मोठ्या उलाढालीचा रस्ता आहे आणि त्यामागे जे. पी. नाईक या माणसाचे कर्तृत्व दडले आहे. ब्रह्मपुरी टेकडी म्हणजे कोल्हापूरचे प्राचीन अस्तित्व.
‘या टेकडीवर यापूर्वी उत्खनन झाले होते. पण नाईक यांनी तिचे आणखी अभ्यासपूर्ण उत्खनन होण्यासाठी दीक्षित, सांकलीया या तज्ञांना कोल्हापुरात बोलावून आणखी उत्खनन करून घेतले. त्यामुळे कोल्हापूर किती प्राचीन आहे, हे जगात पोहोचले गेले.
शर्ट , चड्डी, साध्या चपला
जे. पी. नाईक नगरपालिकेतच राहत होते. सकाळी आंघोळ करून ते बाहेर पडायचे, चहा मराठा बँकेसमोर असलेल्या रानडे यांच्या हॉटेलात घ्यायचे. जेथे पालिकेचे काम सुरू आहे, त्या कामाची पाहणी ते स्वत: करायचे. नागरिकांशी स्वत: बोलायचे. त्यामुळे त्यांना वस्तूस्थिती समजत होती.
रात्रभर वरूणतीर्थ तळ्यावर
शर्ट, चड्डी, साधी चप्पल आणि खांद्यावर पिशवी असा साधा पेहराव त्यांचा होता. वरूणतीर्थ तलावातील कामावेळी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, त्यावेळी पूर्ण रात्र ते तलावाच्या कट्ट्यावर थांबून होते.