For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समर्थ रामदासांच्या वाङ्मयातून दिसणारी प्रपंच-परमार्थाची वाटचाल

06:27 AM Feb 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
समर्थ रामदासांच्या वाङ्मयातून दिसणारी प्रपंच परमार्थाची वाटचाल
Advertisement

आज बुधवार 11 फेब्रुवारी रोजी श्री रामदास नवमी साजरी होत आहे. त्यानिमित्त खास लेख

Advertisement

(पूर्वार्ध)

श्री समर्थ रामदासस्वामी हे सतराव्या शतकातले थोर संत होऊन गेले. लहानपणी घराच्या एका कोपऱ्यात ते ध्यानस्थ बसलेले असताना त्यांच्या आईने त्यांना विचारले, नारायणा डोळे मिटून काय करतोयस रे? त्यावर त्यांनी उत्तर दिले ‘चिंता करतो विश्वाची’ ह्या उत्तरातून पुढे त्यांच्या हातून मोठे समाजकार्य होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. परकीय सत्तेच्या जुलूम जबरदस्तीमुळे त्यावेळची सामाजिक परिस्थिती, चिंता करावी अशीच होती. समर्थांनी तरुण वयातच कठोर तपश्चर्या करून श्रीरामांना प्रसन्न करून घेतले होते आणि त्यांच्या आदेशानुसार देशभर परिभ्रमण करून परकियांच्या आक्रमणामुळे भरडल्या गेलेल्या समाजाला एकसंध केले, लोकांना धीर देऊन अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभे केले. लोकांना त्यांच्या सुप्त शक्तीची जाणीव करून दिल्याने त्यांना देशकार्याची दिशा मिळून ते शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यास मनापासून हातभार लावण्यास सज्ज झाले. पूर्वीच्या काळी लोकांना उपदेश करण्यासाठी संत मंडळी काव्याचा आधार घेत. रामायण, महाभारत ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. ह्या परंपरेला अनुसरून समर्थांनी सामान्य लोकांची प्रपंचाची आवड लक्षात घेऊन तो करत असतानाच परमार्थसाधना कशी करता येईल हे सांगण्यासाठी विपुल काव्यसंपदा निर्माण केली. ती निर्माण करताना त्यांचा मुख्य उद्देश सामान्य माणसांना प्रपंच करत असताना ईश्वराची भक्ती करून, आत्मोद्धार करुन घेण्याच्या उद्देशाने वाटचाल कशी करावी ह्याचे मार्गदर्शन करणे हा होता. ते दासबोधात म्हणतात, संसाराचे सार्थक करण्यासाठी जो कायम टिकणारे काय, नाशवंत काय हे विवेकाने ओळखेल व नित्य वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करेल त्याला इहलोक आणि परलोक दोन्हीही साधेल. संसारा अलियाचे सार्थक । जेथे नित्यानित्य विवेक । त्याला त्याला इह आणि परलोक । दोन्ही साधिजे । समर्थांच्या अर्थपूर्ण रचना दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके इत्यादि नावांनी प्रसिद्ध आहेत. ह्या रचनांनी त्याकाळी समाज जागृती तर केलीच पण आजही त्या लोकांना स्फूर्ती देत आहेत. विशेषत: मनाच्या श्लोकातून समर्थांनी मनाला केलेला उपदेश अभ्यासकांना अत्यंत प्रिय आहे. दासबोधाच्या नित्य वाचनामुळे अत्यंत दुर्मीळ असलेल्या मनुष्य जन्माला आल्यावर आत्मोद्धार करून घेण्यासाठी देह परमार्थी लावण्यातच आपले भले कसे आहे हे ज्याला उमजते त्याच्या जन्माचे सार्थक होते. समर्थ दासबोधात म्हणतात, देह परमार्थी लावले । तरीच त्याचे सार्थक झाले। नाहीतरी व्यर्थची गेले। नाना आघाते मृत्यूपंथे। आत्मोद्धार करून घेण्यासाठी प्रपंच सोडण्याची गरज नसून तो करत असतानाच कोणती पथ्ये पाळावीत म्हणजे ते शक्य होईल हेही दासबोधाच्या अभ्यासाने लक्षात येते. त्यादृष्टीने आदर्श प्रपंच कसा करावा, त्यातून परमार्थ कसा साधावा ह्याचे मार्गदर्शन समर्थांनी केले आहे.

Advertisement

माणसाचे आयुर्मान शंभर वर्षे आहे असे गृहीत धरून प्राचीन काळच्या लोकांनी त्याचे प्रत्येकी पंचवीस वर्षाचा एक असे चार भाग केलेले आहेत. त्यांची नावे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम अशी आहेत. आश्रमधर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीचे जीवन उजळून निघते. माणसाच्या जीवनात धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. जो आश्रम धर्माचे पालन करतो त्याला हे चारही पुरुषार्थ साध्य होतात. आश्रमधर्माबद्दल सांगताना समर्थ म्हणतात, जो आपल्या वयानुसार त्या त्या आश्रमाची कर्तव्ये पार पाडतो तो सत्वगुणी असतो. त्याला रामरायाची प्रीती लागून राहते आणि ज्याच्यावर प्रेम जडते त्याची माणसाला स्वाभाविक ओढ लागते. ती दासबोधातील ओवी अशी, असता आपले आश्रमी । अत्यादरे नित्यनेमी । सदा प्रीती लागे रामी । तो सत्वगुण । ह्या चार आश्रमापैकी गृहस्थाश्रम फार महत्त्वाचा आहे. धनार्जन, कुटुंबाची देखभाल आणि समाजसेवा ही ह्या आश्रमाची प्रमुख कर्तव्ये होत. ती पार पाडत असताना निरपेक्षता, पुत्रादीत अलिप्तता, अखंड सम-चित्तत्ता ह्या गोष्टीना विशेष महत्त्व आहे. समचित्तता म्हणजे ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते निरपेक्षतेने करणे. ज्याप्रमाणे झाडाच्या बी मध्ये झाडाच्या फांद्या, पाने, फुले, फळे सामावलेली असतात त्याप्रमाणे गृहस्थाश्रमात पुढील वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमाची बीजे असतात. गृहस्थाश्रम नीट निभावला तर पुढील आश्रम निभावण्यास अडचण येत नाही. समर्थ त्यांच्या षड्रिपुनिरूपणात सल्ला देतात की, शास्त्राला अनुसरून विषयांचा उपभोग घ्यावा आणि न्यायनितीने प्रपंच करावा म्हणजे तो सुखाचा होतो.

प्रपंच आणि संसार हे शब्द समानार्थी म्हणून वापरले जातात पण प्रपंच ह्याचा शब्दकोषातला अर्थ विस्तार, पसारा, अवडंबर, दिखावा असा असून संसाराचा अर्थ माणसाच्या कटुंबाचा विस्तार असा आहे. म्हणून असे म्हणता येईल की, संसार म्हणजे आपले कटुंबिय आणि त्यांच्याशी संबंधित घटना होत तर प्रपंच म्हणजे आपल्याभोवती आपण वाढवलेला पसारा जसे की, आपली नोकरी, समाजकार्य, मित्रमंडळी इत्यादि. समर्थ जेव्हा प्रपंच असे म्हणतात तेव्हा त्यांना आपल्या कुटुंबीयासह आपला सभोवताल, अभिप्रेत आहे. केवळ मनुष्यच प्रपंच करतो असे नाही तर परमेश्वरानेही मायेला हाताशी धरून, विश्वाचा प्रपंच मांडलेला आहे.

विशेष म्हणजे एव्हढा सगळा आवाढव्य पसारा मांडूनसुद्धा तो त्यापासून अलिप्त असतो. खरं म्हणजे माणसाने ह्यावरून धडा घेऊन त्याने मांडलेल्या प्रपंचापासून अलिप्त रहायला हवं परंतु जसजसे त्याचे वय वाढत जाते तसतसा तो त्यात अधिकाधिक गुंतत जातो. प्रपंचापासून त्याच्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा वाढतच जातात कारण त्याच्यावर मायेचा जबरदस्त प्रभाव असतो. त्यामुळे तो स्वत:ला कर्ता समजत असतो. त्याचा स्वत:च्या कर्तृत्वशक्तीवर कमालीचा विश्वास असतो. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात ह्या म्हणीप्रमाणे तो प्रपंचात आणखीन आणखीन रुतत जातो. पहिल्यापहिल्यांदा माणसाला प्रपंच बरा वाटतो. पुढे काही दिवस गेल्यावर तो थकतो, त्याची उमेद कमी होते. आता आपण परमार्थ करावा असे त्याला वाटू लागते परंतु प्रपंच करताना थकल्यामुळे त्याला परमार्थ तरी आपल्या हातून होईल की, नाही अशी शंका वाटून तो पुन्हा जोराने प्रपंच करू लागतो. अशाप्रकारे स्वत:चा उद्धार करून घेण्याच्या दृष्टीने कोणतीच खटपट न करता त्याचे आयुष्य संपुष्टात येते. माणसाची दयनीय अवस्था पाहून समर्थ त्यांच्या षड्रिपुनिरूपणात म्हणतात, कष्टला शेवटी मेला, गेला प्रपंच हातिचा ।घातला मागुती जन्मा ऐसा वैरी प्रपंच हा ।।12।। माणसाने स्वत:च्या इच्छेवर नियंत्रण न ठेवल्याने प्रपंचासाठी त्याने घेतलेले कष्ट तर वाया जातातच आणि पुनर्जन्म मात्र गळ्यात पडतो. अशाप्रकारे त्याने मांडलेला प्रपंच त्याचाच घात करतो. जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा कारण जग स्वत:ला सांभाळून घेईल पण जो स्वत:चाच घात करुन घेईल त्याला कोण सांभाळणार? ज्यांना नवीन प्रपंच सुरू करायचा आहे त्यांनी तो सावध राहून करावा. त्यांचे लग्न लावताना मंगलाष्टकात शुभमंगल सावधान असे म्हणतात ते यासाठीच.

Advertisement
Tags :

.