For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपावी

10:28 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपावी
Advertisement

आमदार राजू सेठ यांचे पत्रकार दिन कार्यक्रमात प्रतिपादन

Advertisement

बेळगाव : पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे बातम्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.एखादी बातमी छापण्यापूर्वी तिची सत्यता तपासून पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे प्रतिपादन बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी केले. श्रमिक पत्रकार संघटना व माहिती खात्याच्या संयुक्त विद्यमाने रविवारी नेहरूनगर येथील कन्नड भवन येथे पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करताना राजू सेठ पुढे म्हणाले, वृत्तपत्रातील बातम्यांमुळे जनतेत मत तयार होत असते. लोकांच्या भावना भडकतील, अशा बातमीदारीला महत्त्व न देता पत्रकारांनी सत्य लोकांसमोर मांडण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ज्येष्ठ पत्रकार सर्जू काटकर यांनी वृत्तपत्रांच्या इतिहासाचा आढावा घेत पत्रकारांची स्थिती, कौटुंबिक व सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकला. यावेळी सर्वोत्तम जारकीहोळी, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिक बाळोजी, एम. के. हेगडे, मुन्ना बागवान, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना, ब्रह्मानंद हडगली, सुरेश के. आदींसह विविध दैनिकांचे संपादक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांनी पत्रकारांसाठीच्या भविष्याच्या योजना सांगितल्या. महाबूब मकानदार यांनी अध्यक्षांच्या कारकीर्दीत झालेल्या कामांचा आढावा घेतला.

Advertisement

पत्रकारांच्या मुलांसह मान्यवरांचा गौरव

यावेळी दीर्घकाळ सेवा बजावलेले पत्रकार,शासकीय अधिकारी व विविध परीक्षांत उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांच्या मुलांचा गौरव करण्यात आला. दीर्घकाळ पेपर वाटपाचे काम करणारे दांपत्य 84 वर्षीय फकिराप्पा गरगद व त्यांची पत्नी निलव्वा गरगद यांचा सत्कार करण्यात आला. चेतन व्होळ्याप्पगोळ यांनी स्वागत केले. सुकन्या संपत यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement
Tags :

.