सिंधुदुर्गनगरी पत्रकार संघामार्फत २९ जानेवारीला पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धा
पोलीस अधिकारी आणि पत्रकार यांच्यातही रंगणार प्रदर्शनीय क्रिकेट सामना
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बुधवार २९ जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय पत्रकार टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे चौथे वर्ष असून जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघाने आपल्या टीमसह या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यालय पत्रकार संघ अध्यक्ष संदीप गावडे व सचिव लवू म्हाडेश्वर यांनी संयुक्तरित्या केले आहे. विजेत्या संघास ७७७७ रुपये, उपविजेत्या संघाला ५५५५ रुपये असे रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी याच मैदानावर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि पत्रकार यांच्यात प्रदर्शनीय सामना रंगणार आहे.जिल्ह्यातील पत्रकारांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येवून एक दिवस आनंद लुटता यावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने 'पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा' भरवण्याची संकल्पना सुरू करत ती यशस्वी केली. त्याच संकल्पनेनुसार मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर चौथ्या वेळी २९ जानेवारी रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील आठ तालुका आणि एक मुख्यालय असे एकूण नऊ क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत.या स्पर्धेच्या अंतिम नियोजनासाठी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाची नुकतीच अध्यक्ष संदीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात बैठक संपन्न झाली. यावेळी सचिव लवू म्हाडेश्र्वर, खजिनदार गिरीश परब यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा सचिव बाळ खडपकर, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, विनोद परब, सतीश हरमलकर, दत्तप्रसाद वालावलकर, संजय वालावलकर, मनोज वारंग, तेजस्वी काळसेकर आदी उपस्थित होते. यावेळी आयोजित स्पर्धा यशस्वी पार पडावी तसेच कोणतीही उणीव राहू नये यासाठी नियोजन करण्यात आले.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील आठही तालुका पत्रकार संघानी आपली नोंदणी अध्यक्ष संदीप गावडे ( संपर्क क्रमांक- ९४२३३०१४७३) यांच्या जवळ करावी. स्पर्धेच्या विजेत्या संघाला ७७७७ रुपये आणि आकर्षक चषक तसेच उपविजेत्या संघाला ५५५५ रुपये आणि चषक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, अंतिम समान्याचा सामनावीर आणि मालिकावीर यांची निवड करून त्यांना चषक देण्यात येणार आहे. याचबरोबर स्पर्धेच्या उद्घाटन, समारोप यांच्यासह स्पर्धे दरम्यान भेट देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सहभागी खेळाडू, पत्रकार यांच्या नाष्टा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.