विम्याची रक्कम वाढविण्याची पत्रकार संघटनेची मागणी
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेने शहरातील पत्रकारांसाठी आरोग्य विमा योजना लागू करून राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. सद्य:स्थितीत पत्रकारांची संख्या वाढली असून, अद्याप काही पात्र पत्रकार या योजनेच्या लाभार्थी यादीत समाविष्ट होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे सर्व पात्र पत्रकारांना आरोग्य विम्याचा लाभ मिळावा तसेच विम्याची रक्कम वाढविण्याची मागणी पत्रकार संघटनेतर्फे केली आहे. या संदर्भातील निवेदन आयुक्त कार्तिक एम. यांना सादर करण्यात आले. सध्या पत्रकार कल्याण निधीसाठी 50 लाख ऊपयांचे अनुदान राखीव ठेवण्यात आले आहे. वाढत्या पत्रकार संख्येचा आणि वाढत्या वैद्यकीय खर्चाचा विचार करता ही रक्कम अपुरी ठरत असून ती वाढवून किमान 75 लाख ऊपये करावी. आरोग्य विमा योजना नियमितपणे व अखंडितपणे सुरू ठेवावी, तसेच भविष्यातही या योजनेत कोणतीही खंडितता येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी.