दै. तरुण भारतचे पत्रकार जगन्नाथ मुळवी यांचे निधन
फोंडा : गावणे बांदोडा येथील रहिवासी आणि दै. तरुण भारतचे कर्मचारी व पत्रकार जगन्नाथ काशिनाथ मुळवी (54 वर्षे) यांचे काम बुधवार दि. 9 रोजी रात्री 8 वा. सुमारास आकस्मिक निधन झाले. उत्कृष्ट नाट्याकलाकार असलेले मुळवी हे गेल्या एकतीस वर्षांपासून तरुण भारतच्या फोंडा कार्यालयात कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवार दि. 10 रोजी दुपारी 12 वा. गावणे येथील श्री पूर्वाचार्य मंदिराजवळील स्मशानभूमित अंत्यसंस्कार होणार आहेत.
जगन्नाथ मुळवी यांचा पत्रकारितेसह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सक्रीय सहभाग असायचा. अंत्रुज पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी दोन वर्षांपूर्वी कार्यभार सांभाळला होता. नाटक हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. आपल्या ऐन तारुण्यात त्यांनी अनेक नाटकांमधून उत्कृष्ट भूमिका वठविल्या होत्या. ‘अभिनय सम्राट’, ‘वंदे मातरम’ ही त्यांनी लिहिलेली नाटके प्रकाशित झाली होती. हौशी रंगभूमीबरोबरच काही स्पर्धात्मक नाटकांमध्येही त्यांनी अभिनय केला होता.
मडकईमतदार संघातून बातमीदारी करताना अनेक विषयांवर ते सातत्याने लेखन करीत. त्यांच्या वृत्तांकनामधून काही सामाजिक विषयांना वाचा फुटली तसेच गरीब व दुर्बल घटकांना मदतही झालेली आहे. नाट्या व साहित्य क्षेत्रातील त्यांच्या या व्यासंगामुळे अनेक मान्यवरांसह मित्रपरिवाराचा मोठा परिवार त्यांनी जमविला होता. त्यांच्या आकस्मिक निधनाची धक्कादायक बातमी ऐकून अनेकजण फोंडा येथील सावईकर व उपजिल्हा इस्पितळाकडे धावले. त्यांच्यापश्चात पत्नी दीप्ती, पुत्र सार्थ, भाऊ गजानन, लुमो, भावजया कांचन, शर्मिला तसेच विवाहित बहिण उषा गोकुळदास नार्वेकर, पुतणे केतन, वेदांत, वेदश्री, साईक्षा असा परिवार आहे.