भ्रष्टाचार उघड केल्याने पत्रकाराची हत्या
छत्तीसगडमधील प्रकरणात भाजपचा गंभीर आरोप
वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात पत्रकाराची हत्या झाल्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. त्याची हत्या काँग्रेसशी संबंधित असलेल्या एका मार्गबांधणी कंत्राटदाराने केली, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला असून या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. हत्या झालेल्या पत्रकाराचे नाव मुकेश चंद्राकर असे असून तो मुक्त (फ्रीलान्स) पत्रकार होता. या पत्रकाराने केंद्रीय आरक्षित पोलीस दलाच्या एका सैनिकाची नक्षलवाद्यांच्या हातून सुटका करण्यात महत्वाची भूमिका साकारली होती. या सैनिकाचे अपहरण झाले होते.
या पत्रकाराने मार्ग बांधणी मधील भ्रष्टाचार उघड केला होता, म्हणून त्याची हत्या झाली, असा आरोप केला जात आहे. त्याची हत्या करण्याचा संशय सुरेश चंद्राकर या कंत्राटदारावर आहे. सुरेश चंद्राकर याच्या भूखंडातच पत्रकारचा मृतदेह सापडला होता. हा पत्रकार 1 जानेवारीपासून बेपत्ता होता. त्याच्या हत्येप्रकरणात आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली आहे. कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी केली. अटक केलेल्या तीन जणांची कसून चौकशी केली जात असून लवकरात लवकर या हत्येमागचे सत्य शोधण्यात येईल. दोषी व्यक्ती कितीही उच्चपदावर किंवा कोणाशीही संबंधित असली तरी, तिला सोडण्यात येणार नाही. कठोरातील कठोर शिक्षा मिळवून दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले.
छायाचित्र प्रसिद्ध
सुरेश चंद्राकर हा कंत्राटदार काँग्रेस नेत्यांशी संबंधित होता, असा भारतीय जनता पक्षाचा आरोप आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांचा तो निकटवर्तीय होता, असे स्पष्ट करत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्याचे बैज यांच्यासमवेतचे छायाचित्रही प्रसिद्ध केले. दीपक बैज यांनी सुरेश चंद्राकर याची नियुक्ती छत्तीसगड काँग्रेस शाखेच्या अनुसूचित जाती कक्षाच्या अध्यक्षपदी केली होती. यावरुन तो त्यांच्या किती निकट होता, हे दिसून येते, असा आरोपही या पक्षाने केला.
काँग्रेसकडून इन्कार
संशयित कंत्राटदाराचा आपल्या पक्षाशी संबंध असल्याचा आरोप काँग्रेसने नाकारला आहे. छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडली आहे. पत्रकारांचे जीवनही सुरक्षित राहिलेले नाही. राज्य सरकारने या पत्रकाराच्या कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी आणि कुटुंबाला आर्थिक साहाय्य करावे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली.