For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सव्यसाची पत्रकार...संपादक डॉ. किरणराव ठाकुर

12:58 PM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
सव्यसाची पत्रकार   संपादक डॉ  किरणराव ठाकुर
Advertisement

एकेका गावाला त्याचा एक महिमा असतो. त्या त्या गावातील कर्तृत्ववान व्यक्तीमुळे त्या गावाचा नावलौकिक वाढत असतो. बेळगावची भूमी ही नररत्नांची खाणच आहे. पूर्वी ज्याप्रमाणे इंदिरा इज इंडिया असे म्हटले जायचे. तव्दतच बेळगाव म्हटले की अलीकडच्या काळात किरण ठाकुर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. कारण त्यांचे योगदानच तितके भरीव आणि प्रभावी आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त काही आठवणी सांगता येतील.

Advertisement

1919 मध्ये स्व. बाबुराव ठाकुर यांनी बेळगाव ‘तरुण भारत’ या वृत्तपत्राची स्थापना केली. लोकप्रबोधन, अन्यायाविरुद्ध आवाज, शैक्षणिक महत्ता, मराठीची अस्मिता आदी उदात्त हेतूने हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. सुरुवातीला साप्ताहिक, नंतर दैनिक म्हणून याचे कार्य अफाटच आहे. किरण ठाकुर यांनी बाबुराव ठाकुर यांच्यानंतर त्यांचा मार्ग प्रशस्त करताना ‘तरुण भारत’चा विस्तार वाढवत नेला. गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई आदी आवृत्त्या दिमाखात सुरू केल्या. याचे श्रेय किरणरावांना आणि त्यांच्या परिवारासह कर्मचाऱ्यांना द्यावे लागेल. मराठी व सीमाभागातील झगडणाऱ्यांमध्ये ठाकुर आणि ‘तरुण भारत’ नेहमी अग्रेसर राहिला आहे. यासाठी त्यांच्यावर अनेक अन्याय झाले, कर्नाटकी दडपशाही झाली. पण अनेक संकटांवर मात करत ठाकुर यांनी मराठी बाणा कधीच सोडला नाही. हा त्यांचा करारीपणा नजरेत भरणारा आणि नवीन पिढीला आदर्श ठरणारा असाच आहे.

किरणराव माझ्यापेक्षा इयत्तेनं लहान. पण त्यांच्या दोन बहिणी अनुक्रमे शोभा व छाया या नागझरी शाळेत माझ्या वर्गात होत्या. त्यांचे वडील या तिघांना शाळेत सोडायला आणि घेऊन जायला स्वत: यायचे. हा त्यांचा साधेपणा माझ्यावर नकळत संस्कार करून गेला. माझा पेशा आणि पिंड शिक्षकी... ज्ञानदानाचा. किरणरावांनीही शिक्षणासाठी सर्व काही केले. कॉलेज, शाळा काढल्या. लोकमान्य मल्टीपर्पज सेसायटी स्थापन केली. या माध्यमातून आणि वृत्तपत्रातून त्यांनी अनेकांना रोजगार देत त्यांना स्वावलंबी बनविले. आजही ते मराठी तरुणांसाठी सतत धडपडत असतात. त्यांना अर्थसाहाय्य आणि लागेल ती मदत करत असतात. संपादक, पत्रकार असल्याने त्यांचा कर्नाटकासह गोवा, महाराष्ट्र इतकेच काय दिल्ली दरबारीही दरारा आहे. त्यांना आदर तर मिळतोच पण त्यांच्या शब्दाला आपोआपच वजन निर्माण झाले आहे. सीमा चळवळीत तर त्यांनी स्वत:ला संपूर्णपणे झोकून दिले. यासाठी उभारलेल्या अनेक लढ्यांत त्यांनी अग्रभागी राहून नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. इतके सारे असूनही ते अन्य क्षेत्रातही तितकेच चमकताना दिसतात. लोकमान्य सोसायटीचा विस्तार झपाट्याने केला. अगदी अन्य काही सहकारी सोसायट्या किंवा बँकांच्या बरोबरीने लोकमान्यला बसविले. आज या पतसंस्थेची उलाढाल अनेक कोटींच्या घरात जाते. यातून सर्वसामान्यांना आर्थिक आधार देण्याबरोबरच त्यांना अर्थभान देण्याचे कार्यही किरणराव करत आले आहेत.

Advertisement

हा किरण आहे आशेचा, कर्तृत्वाचा, धडाडीचा, हिकमतीचा, दिलदारपणाचा, सर्वसामान्यांचा आधारवड बनण्याचा, निखळ मैत्रीचा, नि:स्वार्थ सेवेचा, अभिमानाचा, प्रत्येक क्षेत्रात गरुड भरारीचा, इतरांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचा.... असे किती सांगावे. किरणरावांना जनता प्रेमाने मामा म्हणूनच संबोधते, यातच सारे काही आले. मामा या शब्दात विलक्षण आत्मियता, प्रेम, जिव्हाळा, मायेचा ओलावा, बांधव्याचा परिसस्पर्श आहे. किरण नावातच जादू आणि अशक्य ते शक्य करण्याचे अमर्याद सामर्थ्य सामावलेले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांवर नितांत विश्वास, सहकाऱ्यांवर प्रेम, लहान-थोरांविषयी कृतज्ञता, आदर, मृदू आणि मिठास वाणी, पायाला भिंगरी, जिभेवर खडीसाखर आणि डोक्यावर बर्फाचा गोळा असे हे हवेहवेसे आणि एक आश्वासक कर्मयोगी व्यक्तिमत्त्व लाभणे हा खरे तर वेणुग्रामचा गौरव आहे. मामांनी इतक्या देणग्या दिल्या आहेत, ज्याला हिशेबच नाही. एक यशस्वी हरहुन्नरी पत्रकार आणि चाणाक्ष संपादक म्हणून मामांचे कार्य अफाट आणि भारदस्त आहे. त्यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

किरण नव्हे तू सूर्य जणू उजळल्या दशदिशा....

-वसंत दांडेकर,निवृत्त शिक्षक,  भाग्यनगर, बेळगाव

Advertisement
Tags :

.