‘चांगभलं’च्या गजरात जोतिबाचा पहिला खेटा संपन्न! श्रींची खडी सुवर्णांलकारीत राजेशाही पुजा; लाखो भाविकांची उपस्थिती
: गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत पालखी सोहळा उत्साहात
विनोद चिखलकर जोतिबा डोंगर
जोतिबाच्या नावानं चांगभलं, केदारनाथाच्या नावानं चांगभलं, गजरात रविवारी जोतिबाचा पहिला खेटा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी श्रीस महाभिषेक, महापोशाख, धार्मिक विधी, महाआरथी महानैवेद्य, धूपारती सोहळा झाला. गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत पालखी सोहळा मोठ्या उत्साहात झाला.
पहिल्या खेट्यानिमित्त लाखों भाविकांनी डोंगरावर श्रीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. श्रीच्या अभिषेक वेळात दर्शनरांग बंद ठेवली होती, यावेळी मंदिरामध्ये भाविकांना दर्शन घेताना सुलभ दर्शन होत होते. त्यामुळे भाविक भक्त समाधानाने दर्शन घेत होते.
पहिल्या खेट्यानिमित्य रविवारी श्री जोतिबाची खड़ी आकर्षक सुवर्णालंकारीत महापुजा बांधण्यात आली. ही पुजा श्रीचे पुजारी वामन ठाकरे, उत्तम भिवदर्णे, महालिंग शिंगे, राजाराम बनकर, बाळासो सांगळे, आकाश ठाकरे, नितीन लादे, पंकज सांगळे, यश चिखलकर, केदार दादर्णे, विघ्नेश चिखलकर, नेताजी दादर्णे यांनी बांधली. नंदी, महादेव, चोपडाई, काळभैरव व यमाईदेवीची महापूजा स्वप्निल दादर्णे, रामदास शिंगे, तुषार झूगर, केदार शिंगे, गणेश बूणे, गणेश दादर्णे, गणेश चौगले, पंढरीनाथ झूगर यांनी बांधली हेती.
केदार विजय ग्रंथांमध्ये जोतिबाच्या खेट्याचे महात्म्य सांगितले आहे. यामध्ये खेट्याविषयी असा उल्लेख आहे, माघ महिन्यात पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भरणाऱ्या यात्रेस जोतिबाचे खेटे असे संबोधले जाते. पुर्वी केदारनाथ (श्री जोतिबा) दक्षिण मोहीम संपवून हिमालयाकडे जाण्यास निघाल्याचे करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) समजताच ती कोल्हापूरहून अनवानी डोंगरावर आली. अंबाबाईने केदारनाथांना न जाण्याविषयी विनवले. तेव्हा नाथांनी वाडी रत्नागिरीवर भक्तांसाठी व अंबाबाईसाठी राहण्याचे मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूरहून डोंगरावर चालत खेटे घालण्याची प्रथा सुरु झाली, असा उल्लेख ग्रंथामध्ये आहे.
रविवारी पहिल्या खेट्याला परंपरेनुसार कोल्हापूरसह बेळगाव, सांगली, कराड, पुणे, बार्शा, लातूर, पंढरपूर, सोलापूर, मुंबईहून भाविक श्रंाrच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. पहाटे तीन वाजल्यापासून डोंगर-दऱ्यांतून कुशीरे, पोहाळे, गिरोली, केर्ली, केर्ले, वारणा, वाघबीळ परिसरातून वाट काढत जोतिबा डोंगरावर भाविक पोहोचले. त्यामुळे मंदिर व परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
दरम्यान, पहाटे चार वाजता महाघंटा वाजवून श्रींच्या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. श्री जोतिबा देवाची पाद्यपूजा व काकडआरती करण्यात आली. श्री जोतिबा देवाबरोबर नंदी, महादेव, चोपडाई, काळभैरव, यमाई, दत्त, रामलिंग देवांना महाभिषेक घालून आकर्षक महापूजा बांधण्यात आली. त्यानंतर मंत्रोच्चार, धुपारती करून महानैवेद्य दाखवण्यात आला.
रविवारी रात्री 8 वाजता उंट, घोडा, वाजंत्री, देवसेवक, हुद्देवाले, कंचाळवादक, डवरी, ढोली, म्हालदार, चोपदार, श्रींचे पुजारी, देवस्थान समिती अधिकारी धैर्यशील तिवले व सिंधिया ग्वाल्हेर देवस्थान समितीचे अधिकारी अजित झुगर व कर्मचारी आदी लव्याजम्यासह पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी निघाला. मंदिर प्रदक्षिणा घालून पालखी सदरेवर आली. यावेळी तेथे म्हालदार, ढोली, डवरींचा धार्मिक विधी, मंत्रोच्चार, ओव्या झाल्यानंतर तोफेची सलामी देऊन पालखी मंडपात आली.
देवस्थान समितीचे इंचार्ज ऑफिसर धैर्यशील तिवले यांनी भाविकांच्या सेवेसाठी पिण्याचे पाणी, दर्शन रांगेवर नियंत्रणासाठी 25 सिक्युरिटी गार्ड तसेच अभिषेकावेळी उत्तम नियोजन केले होते. तसेच जोतिबा डोंगरावर कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता.