जोतिबा मुर्तीवर २१ ते २४ जानेवारीपर्यंत होणार संवर्धन प्रक्रिया
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची माहिती
पुरातत्व विभागाकडून होणार मूर्ती संवर्धन प्रक्रिया
भाविकांसाठी मंदिरातील कासव चौकात ठेवली जाणार उत्सवमूर्ती
कोल्हापूर
भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली व पुरातत्व विभाग, पुणे यांनी मौजे वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथील श्री. केदारलिंगाची (देव जोतिबा) मुळ मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या अनुषंगाने अहवाल सादर केला होता. त्यानुसार श्री जोतिबा देवाच्या मूळ मूर्तीची 21 ते 24 जानेवारीअखेर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत जोतिबा देवाच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. त्यामुळे भाविकांसाठी या कालावधीत मंदिरातील कासव चौक येथे ठेवण्यात येणारा कलश व उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन देवस्थान व्यवस्थापन समितीसह पुजारी वर्गाला सहकार्य करावे असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने केले आहे.
जिल्हाधिकारी तथा देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी श्री जोतिबा मूर्तीची पाहणी करण्यासाठी वेळोवेळी पुरातत्व विभागाला कळविले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली व पुरातत्व विभाग, पुणे यांच्याकडून मूर्तीची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगाने अहवाल दिला होता. या अहवालानुसार देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने मूर्तीची रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना (दिल्ली) 3 जानेवारी 2025 च्या पत्राने कळविले होते. त्यानुसार 17 जानेवारी 2025 रोजी भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली यांच्याकडील अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली. पाहणीअंती भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली कडील अधिकारी व सहाय्यक संचालक तसेच पुरातत्व विभाग, पुणे यांनी देवस्थान व्यवस्थापन समिती व गावकर प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून श्री केदारलिंग (देव जोतिबा) देवस्थान मूर्तीची रासायनिक संर्वधन प्रक्रिया मंगळवार 21 ते 24 जानेवारीअखेर करण्याचा निर्णय घेतला आहे