बोट मोडलेल्या जोसेफने कांगांरुची मोडली खोड
ब्रिस्बेन कसोटीत मोठा उलटफेर : विंडीजचा ऑस्ट्रेलियावर 8 धावांनी विजय : मालिकावीर जोसेफचे 68 धावांत 7 बळी
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
वेस्ट इंडिजने तब्बल 27 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटीत पराभूत करत इतिहासाची पुनरावृत्ती केली. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ब्रिस्बेनमधील गढबावर खेळला गेला. या सामन्यात विंडीजने यजमान ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव केला. 1997 नंतर विंडीजचा ऑस्ट्रेलियातील हा पहिला विजय आहे. दुस्रया डावात सात आणि पहिल्या डावात एक विकेट घेत युवा वेगवान गोलंदाज शामर जोसेफने ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची कहाणी लिहिली. या विजयासह विंडीजने दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. जोसेफला त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे मालिकावीर आणि सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
दिवस रात्र कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजने 311 धावा केल्या होत्या. यानंतर पाहुण्या संघाने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 289 धावात संपवला व विंडीजला पहिल्या डावात 20 धावांची निसटती आघाडी मिळाली. दुस्रया डावात विंडीजला 193 धावाच करता आल्या व ऑसी संघाला विजयासाठी 216 धावांचे टार्गेट मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑसी संघाने तिसऱ्या दिवसअखेरीस 2 गडी गमावत 60 धावा केल्या होत्या. पण, चौथ्या दिवशी पण ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. स्टीव्ह स्मिथने एक बाजूने किल्ला लढवला, पण त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. स्मिथने सर्वाधिक नाबाद 91 धावा केल्या तर कॅमरुन ग्रीनने 42 धावांचे योगदान दिले. विजयासाठी अवघ्या 8 धावांची गरज असताना शामर जोसेफने हॅजलवूडला शुन्यावर बाद करत वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडिज पहिला डाव 311 व दुसरा डाव 193
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 289 व दुसरा डाव 50.5 षटकांत सर्वबाद 207 (स्मिथ नाबाद 91, कॅमरुन ग्रीन 42, मिचेल स्टार्क 21, शामर जोसेफ 68 धावांत 7 बळी, अल्जारी जोसेफ 2 बळी).
जखमी असतानाही असह्या वेदना सहन करत मिळवून दिला विजय
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी विंडीजचा दुसरा डाव 193 धावांमध्ये गुंडाळला. शमार जोसेफ शेवटच्या विकेटसाठी खेळत होता. डावातील 73 व्या षटकात मिचेल स्टार्कने तिसरा चेंडू यॉर्कर टाकला, जो थेट जोसेफच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर लागला. चेंडू पायाला लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून पायचीतची अपील केली गेली. पंचांनी देखील जोसेफला बाद दिले. पण जोसेफने डीआरएसचा वापर केला. जोसेफने घेतलेला डीआरएसचा निर्णय योग्य ठरला आणि तो पायचीत झाला नाही. मात्र अंगठ्याला चेंडू लागल्यानंतर तो चालू देखील शकत नव्हता. अशात दोन खांद्याचा आधार देत काही खेळाडूंनी मैदानाबाहेर नेले. दुखापतीमुळे युवा खेळाडू गोलंदाजीसाठी मैदानात येईल, अशी शक्यता कमी होती. पण त्याने शेवटच्या डावात गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 24 वर्षीय युवा गोलंदाजांने कहर माजवताना तब्बल सात विकेट्स नावावर करत त्याने यजमान ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. जोसेफने 11.5 षटके गोलंदाजी करताना अवघ्या 68 धावांत 7 बळी घेत त्याने विंडीजच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
ऐतिहासिक क्षण, डोळ्यात अश्रू अन् विंडीज खेळाडूंचा जल्लोष
नव्या दमाच्या वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया केली. वेस्ट इंडिजच्या या ऐतिहासिक विजयानंतर माजी स्टार खेळाडू ब्रायन लाराला अश्रू अनावर झाले. समालोचन करत असलेला लारा विजयानंतर भावूक झाल्याचे दिसून आले. युवा आणि कमी अनुभव असलेल्या या संघाने आज तगड्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. विंडीज क्रिकेटसाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे. विंडीजच्या प्रत्येक खेळाडूचे कौतूक करावे लागेल, असे लाराने म्हटले आहे.
ब्रायन लारा हा वेस्ट इंडिजचा महान खेळाडू आहे तर गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलियाचा माजी महान फलंदाज आहे. पण जेव्हा वेस्ट इंडिजने गाबा कसोटी जिंकली तेव्हा, या दोन्ही खेळाडूंनी तो क्षण साजरा केला. ऑस्ट्रेलिया पराभूत झाली, याचे दुख गिलख्रिस्टला झाले नाही, असे नाही. पण शेजारी बसलेला त्याचा मित्र ब्रायन लारासाठी आणि त्याच्या देशासाठी हा क्षण खास होता. हाच खास क्षण गिलख्रिस्टने लारासोबत साजरा केला. शमार जोसेफने हॅजलवूडला क्लीन बोल्ड करताच गिलख्रिस्टने लाराला कडकडून मिठी मारली. खिलाडूवृत्ती कशाला म्हणतात ते गिलीने दाखवून दिले.