ह्युंडाई मोटारच्या सीईओपदी जोस मुनोज
मुंबई :
ह्युंडाई मोटारने शुक्रवारी विद्यमान यूएस मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्लोबल चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जोस मुनोज यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. यासह दक्षिण कोरियाच्या वाहन निर्मात्याचे नेतृत्व करणारा मुनोज हा पहिला विदेशी सीईओ ठरला आहे.
मुनोज हे वर्ष 2019 मध्ये उत्तर आणि दक्षिण अमेरिकेसाठी ऑपरेशनल जबाबदारीसह ग्लोबल चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून ह्युंडाईमध्ये सहभागी झाले. याअगोदर त्यांनी निस्सान मोटर कंपनीमध्ये 15 वर्षे काम केले, ज्यात चीनच्या युनिटचे अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ राहिला होता.
कंपनीने शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध केले की स्पेनमध्ये जन्मलेले मुनोज हे जेहुन चांगची जागा घेतील. चांग यांना कंपनीने ऑटोमोटिव्ह विभागाचे उपाध्यक्ष म्हणून पदोन्नती दिली आहे. हा बदल 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.
ह्युंडाईच्या एकूण उत्पन्नात 8.34 टक्के घट
जुलै-सप्टेंबर तिमाहीत ह्युंडाई इंडियाचे एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर 8.34 टक्के कमी होऊन 17,452 कोटींवर आले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 19,042 कोटी रुपये होते.