जॉर्डन ते ओमान : सांस्कृतिक संबंध नव्या उंचीवर नेणारी सक्रिय भागीदारी
(उत्तरार्ध)
इथिओपियातील भारतीय समुदायाने त्या राष्ट्राच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा उचलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समुदायास प्रेरक स्फूर्तीदायक भाषण करून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. मोदी यांचे तेथील संसदेत झालेले भाषण संस्कृती संवर्धन, लोकशाही मूल्ये व रचनात्मक विकास या तीन पायांवर आधारित होते. मंत्रमुग्ध करणाऱ्या या भाषणाने तेथील खासदारांची मने जिंकली. इथिओपियाचा निशान हा सर्वोच्च सन्मान प्राप्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव नेते आहेत. मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा वैश्विक दबदबा भारताची प्रतिष्ठा उंचावणारा आहे.
आफ्रिकेचे प्रवेशद्वार
एखाद्या देशाचे भू-राजनैतिक स्थान हे त्याच्या समृद्ध आणि संपन्न भूमीप्रमाणेच त्याच्या भौगोलिक स्थानावर सुद्धा अवलंबून असते. या सिद्धांतास इथिओपिया हा देश अपवाद नाही. आफ्रिका खंडाचे मागासलेपण दूर करावयाचे असेल तर आपणास त्याच्या प्राकृतिक वैभवाचे रूपांतर, नैसर्गिक संपत्तीचे संक्रमण हे भौतिक साधन संपत्तीमध्ये करावे लागेल. त्या दृष्टीने इथिओपिया हा देश एक नमुनेदार उदाहरण ठरू शकतो. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बदल हे परिवर्तनाची गुरुकिल्ली असतात. या दृष्टीने विचार करता निसर्ग, लोक आणि संस्कृती यांच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करणे ही आफ्रिकेच्या दृष्टीने काळाची गरज आहे.
आफ्रिकेला जी-20 देशात कायम सदस्यत्व मिळवून देण्यासाठी भारताने घेतलेला पुढाकार हा कलाटणी देणारा वळणबिंदू म्हणजे टर्निंग पॉईंट ठरला आहे. त्याची प्रचिती पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याने आली आहे.
इथिओपिया या देशाला आफ्रिकेचे प्रवेशद्वार म्हटले जाते तसेच हा सिंहांचा देश आहे. समृद्ध निसर्ग, विपुल खनिज संपत्ती आणि कृषी व उद्योग क्षेत्रात प्रगतीची नवी आकांक्षा घेऊन झेपावणारा देश स्वातंत्र्यापासून आधुनिक युगापर्यंत भक्कमपणे भारताच्या बाजूने उभा आहे. पंतप्रधान मोदी यांची ही इथिओपियाला पहिलीच भेट होती. या भेटीमध्ये त्यांनी तेथील संसदेसमोर दिलेले अभिभाषण आणि अनिवासी भारतीयांसमोर केलेले मार्गदर्शक भाषण या दोघांचा ठसा संपूर्ण आफ्रिकेवर उमटला आहे. शिवाय उभय देशांत संमत झालेले सामंजस्य करार हे विकासाच्या सक्रिय भागीदारीचे प्रतीक म्हटले पाहिजेत. या करारांमध्ये व्यापार, आर्थिक गुंतवणूक, अक्षय ऊर्जा तसेच मौलिक खनिजे, कृषी, संशोधन, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. रेल्वे, विद्युतीकरण आणि उद्योग विकासासाठी भारताने एक बिलियन
डॉलर्स गुंतवणूक केली आहे. शेतकऱ्यांना भारत सोलार ऊर्जा कृषी पंप पुरविणार आहे. नवा मध्य पूर्वेला आणि युरोपला जोडणारा सागरी मार्ग तसेच उद्योगातून रोजगार निर्मिती, संरक्षण क्षेत्रातील सहकार्य या तीन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. भारतीय शिक्षकांनी इथिओपियात सातत्याने ज्ञानदानाचे कार्य केले. त्यातून राष्ट्राची जडणघडण झाली. तेथील आधुनिक इतिहासाची जडणघडण भारतीय शिक्षणामुळे झाली आहे. भारतीय उद्योजकांनी पाच बिलियन डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक करून तेथे पंच्याहत्तर हजार नवे रोजगार उभे केले आहेत.
ओमान भेटीचे योगदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ओमान दौरा अनेक दृष्टीने महत्त्वाचा होता. या भेटीमध्ये त्यांनी उभय राष्ट्रांतील व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला तसेच दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांना सत्तर वर्षे पूर्ण झाल्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व होते. ओमानचे सुलतान काबून बिन सैद अल सैद यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानला भेट दिली. संबंध मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानामुळे आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे ओमानच्या सुलतान महोदयांनी मोदी यांना ऑर्डर ऑफ ओमान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. या भेटीदरम्यान व्यापक आर्थिक भागीदारी करार दृष्टीपथात आला तसेच या करारामुळे दोन्ही देशांसाठी विविध क्षेत्रांतील सहकार्याचे आणि सर्वांगीण विकासाचे नवयुग अवतरले आहे. या करारामुळे दोन्ही देशांतील व्यापाराचे दरवाजे नव्याने उघडतील. भारत-ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारी लक्षणीयरीत्या मजबूत होईल आणि ती नव्या वळणावर पोहोचेल. दोन्ही बाजूंनी सागरी सहकार्य, उच्च शिक्षणात आदान-प्रदान, कृषी क्षेत्रात बाजरीची लागवड अशा प्रमुख सहा करारांवर सह्या करण्यात आल्या. हे सामंजस्य करार दोन्ही देशांतील आर्थिक संबंधांना नवी बळकटी देणारे आहेत.
ओमान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज यांच्यातील एक सामंजस्य करारसुद्धा दोन्ही देशांच्या उद्योगांना नवी दृष्टी देणारा ठरला आहे. भारत-ओमान संयुक्त निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान, आदान-प्रदान, उच्च शिक्षण आणि लोकसंपर्क अशा अनेकविध विषयांवर चर्चा करून द्वीपक्षीय संबंध उत्कृष्ट स्थितीपर्यंत नेऊन पोहोचविले आहेत. भारत-ओमान दरम्यान सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक सहकार्य अनेक नवीन दिशांनी उजळत आहेत. कृषी, उद्योग आणि शिक्षण तसेच आरोग्य आणि सुरक्षा या क्षेत्रांतील दोन्ही देशांचे संबंध हे परस्परपूरक हितवर्धक आणि लोककल्याणकारी कार्यास गती देणारे ठरले आहेत. दोन्ही देशांनी गाझा पट्टीमधील तणाव तसेच युक्रेनबाबत निर्माण झालेले पेचप्रसंग याबाबतीत शांतता आणि संवादातून तोडगा या मुद्यांवर भर दिला. दहशतवादाच्या प्रश्नावर सुद्धा दोन्ही देशांनी एकमत साध्य केले असून, रचनात्मक विकासावर उभयतांनी भर दिला आहे. व्यापारातून निर्माण झालेली मैत्री आता शिक्षणाच्या शिखरापर्यंत पोहचली आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून भारत-ओमान भागीदारी नव्या उंचीवर पोहोचत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांचे भारतीय समुदायासमोर झालेले भाषण नव्या मूल्य प्रेरणा जागविणारे ठरले आहे. मांडवी आणि मस्कतमधील सांस्कृतिक नाते आता नवी आर्थिक शक्ती घेऊन प्रकट झाले आहे. 21 व्या शतकात नवा विश्वास व नवी ऊर्जा दोन्ही देश विकसित करत आहेत. पेट्टा आणि वेरूळ लेणी यांच्या पुराणवस्तू संवर्धनाचा करार महत्त्वाचा असून त्यामुळे पर्यटन व सांस्कृतिक आदानप्रदानाला नवी गती लाभणार आहे.
समारोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या तीनही देशांच्या दौऱ्याचे सार काय असेल तर या तीनही देशांशी भारताचा प्राचीन काळापासून व्यापार आहे. आता प्राचीन सांस्कृतिक संबंधांना नवी उंची, नवी ऊर्जा आणि नवे चैतन्य देऊन त्यातून सक्रिय भागीदारीचे एक नवे पर्व उदयास येत आहे. या तीनही देशांशी झालेले सामंजस्य करार हे त्यामुळे केवळ व्यापार वृद्धीसाठी नव्हे, तर त्यातून शिक्षण, तंत्रज्ञान आणि मानवी संबंधांचा नवा प्रवास प्रारंभ करणारे ठरले आहेत. त्यामुळे सरत्यावर्षी या तीन देशांचा दौरा करून भारताचे आर्थिक व सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे. अमेरिकेच्या टेरिफ धोरणला प्रतिशह देताना पंतप्रधानांनी छोट्या आफ्रिकन व आशियाई देशांशी मैत्रीचा सेतू बांधून आर्थिक तटबंदी अधिक मजबूत केली आहे, असेच म्हणावे लागेल.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर