For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोर का झटका धीरे से लगे!

02:20 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
जोर का झटका धीरे से लगे
Advertisement

ईडन गार्डन्स म्हटलं की आपल्याला काय काय आठवतं. स्मरणशक्तीला थोडासा जोर द्या. इतकं करून तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला सांगतोय. याच मैदानावर 1987 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेत तेथील प्रेक्षकांनी सुनील गावस्कर सरांशी केलेली गैरवर्तणूक आणि त्यानंतर भविष्यात तिथे न खेळण्याचा केलेला ‘पण’.

Advertisement

ईडन गार्डन्स म्हटलं की आठवतो 1996 चा वर्ल्डकप. उपांत्य फेरीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विनोद कांबळीचे अश्रू आपण मैदानात पाहिले. (प्रेक्षकांचा तो गोंधळ आणि भारताचा पराभव). याच मैदानावर द्रविड-लक्ष्मणची फॉलोऑन नंतरची विश्वविक्रमी खेळी पाहिली. (त्यानंतर बरेच संघ फॉलोऑन देणं टाळू लागले). 2016 मध्ये भारतात जो अंतिम टी-20 विश्वचषक झाला होता त्यावेळी याच मैदानावर विंडीजने ‘चॅम्पियन चॅम्पियन’ या गाण्यावर नाच करत सर्वांना सुखद धक्का दिला होता. (विशेषत: ख्रिस गेल). परंतु आज मैदान तेच. जवळपास खेळपट्टी तीच. परंतु डोळ्यातील अश्रू मात्र वेगळेच. शनिवार आणि रविवार हे भारतीय क्रिकेटसाठी निश्चितच सुखद दिवस. शनिवारी जम्मू-काश्मीर या संघाने ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ हा शब्दप्रयोग क्रिकेटमध्ये सत्यात उतरवला. अपार परिश्रमानंतर रणजी ट्रॉफीतील त्यांचं पहिलं विजेतेपद. आणि काल कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर ‘कभी अंदर कभी बहार’ असे म्हणत या सुपरएटच्या महत्त्वपूर्ण सामन्यात ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे’ या गीतातील मथितार्थाला अनुसरून नाही नाही म्हणत भारताने विंडीजला धूळ चारली. लग्नानंतर ‘रिसेप्शन’ आपण नेहमीच बघतो. कालचा विजय हा अंतिम विजयाच्या अगोदरचा स्वागतसोहळा होता. कालचा सामना ना उपांत्य फेरीचा, ना अंतिम सामना होता. परंतु हा विजय हा पहिल्या प्रेमासारखा होता जो कधी विसरता येत नाही अगदी तसा.

विजयाचं गोड स्वप्न घेऊन उतरलेला विंडीजचा संघ. पण ज्या डोळ्यांनी स्वप्नं पाहिली तो डोळाच भारतीय संघाने निकामी केला. नाणेफेक जिंकत योग्य निर्णय घेणं कधीकधी दुग्धशर्करा योगासारखं असतं. निर्णय चुकला तर त्याचं विरजण बनते. काल आपल्यासाठी तो दुग्धशर्करा योग होता. काल सर्वच गोलंदाजांनी पहिल्या दहा षटकात अचूक मारा करत आक्रमकतेचा ‘वसा’ घेऊन प्रत्येक ठिकाणी फिरणाऱ्या विंडीजला जेरीस आणलं. शेवटच्या दहा षटकात पुन्हा एकदा पॉवेल आणि होल्डरने तो वसा आपल्या खांद्यावर घेतला. काल बुमराह रात्रीच्या सामन्यात सूर्यासारखा चमकला. आणि आनंद मात्र कोजागिरी पौर्णिमेच्या त्या रात्रीच्या चांदण्यासारखे देऊन गेला. विंडीज आणि आक्रमकता हे समानार्थी वाटणारे शब्द आज विरुद्धार्थी वाटू लागले.

Advertisement

195 धावांचा पाठलाग करताना तुम्हाला साजूक तुपातली तंत्राची आवश्यकता नाही. त्याला हवी असते मुक्तछंदातील फलंदाजी. अर्थात ही फलंदाजी साकारली प्रथम संजू सॅमसनने. नंतर त्याला छान साथ दिली ती तिलक वर्माने. काल जर एखाद्या इन्शुरन्स कंपनीने फलंदाजाच्या विकेटचं इन्शुरन्स काढायचे ठरवलं असतं तर कदाचित संजय सॅमसनच्या नावाने नाकं मुरडली असती. पण ते त्या इन्शुरन्स कंपनीला संजूच्या नावाने इन्शुरन्स काढलं असतं तर बरं झालं असतं, असं निश्चित वाटू लागेल. संजू सॅमसनच्या मखमली स्पर्शाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी नेहमीच लक्षात राहील. करो या मरो, या सामन्यात 200 च्या आसपास असणाऱ्या धावसंख्येचा पाठलाग करणं म्हणजे सिनेमाच्या मध्यंतरानंतर पॉपकॉर्न खाण्याएवढं सोपं नव्हतं. संजू सॅमसन म्हणा किंवा तिलक वर्मा म्हणा, अशा फलंदाजांना क्रिकेटच्या शेअर बाजारात वावरणं आवडतं. काल ज्यांनी ज्यांनी यांचा शेअर खरेदी केला ते खऱ्या अर्थाने मालामाल झाले असतील. टी-20 क्रिकेटमध्ये हा खेळ कधी कोणाच्या नरड्याचा घोट घेईल हे सांगता येत नाही. काल हा घोट विंडीजचा घेतला गेला. धावांचा आयफेल टॉवर बनवणारा हा संघ कधी दहा बाय दहाच्या घरात अडकला हे कळलंच नाही. या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक सामन्यात एक स्पीडब्रेकर होता. परंतु या कालच्या सामन्यात स्पीडब्रेकरवर व्यवस्थित गिअर बदलत भारताने हा सामना सहज खिशात घातला. पूर्ण दबाव खाली मिळवला हा विजय हा निश्चितच कौतुकास्पद यात काही शंका नाही.

Advertisement
Tags :

.