जोनाथन अॅन्टोनी, सिफ्ट कौर यांना नेमबाजीत सुवर्ण पदक
वृत्तसंस्था / डेहराडून
येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी कर्नाटकाचा 15 वर्षीय नेमबाज जोनाथन अॅन्टोनीने पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले. त्याने या क्रीडा प्रकारात पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कास्यपदक विजेत्या सरबज्योत सिंग आणि सौरभ चौधरी यांना मागे टाकले.
2022 साली झालेल्या सीबीएसई दक्षिण विभागीय रायफल नेमबाजी स्पर्धेत बेंगळूरच्या जोनाथन अॅन्टोनीने 8 व्या इयत्तेत शिक्षण घेत असताना नेमबाजी प्रकारात सुवर्ण पदक मिळविले होते. जोनाथनचे यावेळी वय 12 वर्षांचे होते. डेहराडूनमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत जोनाथन अॅन्टोनीने 240.7 गुणासह कर्नाटकाला सुवर्ण मिळवून दिले. या क्रीडा प्रकारात सेनादलाच्या रविंद्र सिंगने 240.3 गुणांसह रौप्य पदक तर गुरप्रित सिंगने 220.1 गुणासह कास्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात सरबज्योत सिंगला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले तर सौरभ चौधरी नवव्या स्थानावर फेकला गेला. अंतिम फेरीपूर्वी झालेल्या पात्र फेरीमध्ये रविंद्र 584 गुणांसह आघाडीवर होता. तर सरबज्योत सिंग 583 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. मात्र जोनाथन पात्रता फेरीमध्ये तळाच्या स्थानावर राहिला होता
सिफ्ट कौरला सुवर्ण
महिलांच्या 50 मी. रायफल-थ्री पोझीशन नेमबाजी प्रकारात पंजाबच्या सिफ्ठ कौर सामराने 461.2 गुणांसह सुवर्णपदक मिळविले असून ऑलिम्पिक नेमबाज अंजुम मोदगिलने 458.7 गुणासह रौप्य तर तेलंगणाच्या सुरभी भारद्वाजने 448.8 गुणासह कास्यपदक मिळविले.