Navratri 2025 Jotiba Temple: जोतिबा डोंगरावर चांगभलंचा गजर, सुवर्णालंकारित खडी आकर्षक महापूजा
महाराष्ट्र, कर्नाटकातून भाविकांची श्री च्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी झाली
जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री क्षेत्र वाडिरत्नागिरी जोतिबा डोंगर येथील मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवातील चौथा दिवस भाविकांच्या प्रचंड गर्दीत उत्साही वातावरणात संपन्न झाला. गुरुवारी चौथ्या दिवशी श्री जोतिबा देवाची सोहन कमळातील पाच पाकळ्यांतील सुवर्णालंकारित खडी आकर्षक महापूजा बांधण्यात आली.
जोतिबा देवाची लिंग स्वरूपातील बद्रिकेदार महादेव मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त सुंदर महापूजा बांधण्यात आली होती तर पश्चिम देवस्थान समितीतर्फे जोतिबा मंदिराच्या सर्व शिखरावर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटकातून भाविकांची श्री च्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी झाली होती, दर्शन मंडप ते मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ‘श्रीं’स गुलाल दवणा, तेल, कडाकणी, श्रीफळ अर्पण करून श्रींचे दर्शन करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती व जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात व गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत भाविक भक्त तल्लीन झाले होते.
दरम्यान पहाटे 3 वाजता घंटानाद करून श्रींच्या मंदिरांचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर ‘श्रीं’सह सर्व देव- देवतांची पाद्यपूजा - काकडआरती, महाभिषेक, महापोशाख घालून महापूजा बांधण्यात आली. त्यानंतर धार्मिक विधी व धुपारती करून महानैवेद्य दाखवण्यात आला.
दहा वाजता उंट, घोडा, वाजंत्री, श्रीचे पुजारी, देवसेवक, हुद्देवाले, ढोली, डवरी, म्हालदार, चोपदार, देवस्थान समितीचे अधिकारी, धैर्यशील तिवले सेंधिया देवस्थान ट्रस्टचे अधिकारी अजित झुगर व कर्मचारी शाही पोशाखात, भाविक भक्त ,नवरात्रकरी, ग्रामस्थ,पुजारी,
असा लवाजमा यमाई मंदिराकडे गेला. तेथे धार्मिक विधी करून हा लवाजमा परत जोतिबा मंदिरात आला. त्यानंतर तोफेची सलामी देऊन हा सोहळा श्रीं च्या मंदिरात नेण्यात आला. त्यानंतर त्रिकाळ आरती करून अंगारा वाटप करण्यात आला. रात्री भजन , भावगीताचा कार्यक्रम करण्यात आला. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात होता.
सुवर्णालंकारित खडी आकर्षक महापूजा श्री जोतिबा देवाची सोहन कमळातील पाच पाकळ्यांतील सुवर्णालंकारित खडी आकर्षक महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा श्री चे पुजारी विशाल ठाकरे, मधूकर ठाकरे, अंकुश दादर्णे, दगडू भंडारे संजय ठाकरे, जगन्नाथ ठाकरे, गणेश दादर्णे, शेखर ठाकरे, प्रवीण कापरे, गणेश बुणे, अजित भंडारे, प्रल्हाद झुगर, संतोष उपाध्ये, उमेश शिंगे, प्रकाश सांगळे, विनोद मिटके, लखन ठाकरे, हरिदास सातार्डेकर, अविनाश कापरे, दिपक भिवदर्णे, गजानन लादे यांनी बांधली.
काळभैरव यमाई चोपडाई महादेव नंदी या देवांची महापूजा केदार चिखलकर, आदीनाथ लादे, सुनिल सांगळे, केदार शिंगे, स्वप्निल दादर्णे, तुषार झुगर, हर्षद बुणे, सचिन मिटके, कैलास ठाकरे, सतीश मिटके, अजित बुणे, सौरभ सांगळे, जयदिप आमाणे, अशोक मिटके, सुमित भिवदर्णे, रोहन सांगळे, निवास मिटके यांनी बांधली.