मध्यवर्ती म. ए. समिती-पुणे विभागाची संयुक्त बैठक
आगामी काळातील आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा
त. भा. प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सीमाभागातील सद्य:स्थिती, मराठी शाळांसमोरील प्रश्न, युवकांचे संघटन, तसेच आगामी काळातील आंदोलनाची दिशा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पुणे विभागाकडून केलेल्या कार्याचे मध्यवर्ती म. ए. समितीने कौतुक केले. पुणे विभाग म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी संघटनेत युवकांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्याची गरज व्यक्त केली. युवकांना संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेऊन त्यांना कार्य करण्याची अधिक संधी द्यावी, अशी सूचना करण्यात आली. मध्यवर्ती म. ए. समिती, तसेच घटक समित्या नेहमीच युवावर्गाच्या पाठीशी असल्याचे सांगण्यात आले.
सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा
पुणे विभाग समितीच्यावतीने मध्यवर्ती म. ए. समिती, घटक समित्या आणि युवा समित्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकारकडे सीमाप्रश्नाबाबत पाठपुरावा सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्नशींल राहण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, विलास बेळगावकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, अॅड. महेश बिर्जे, अॅड. एम. जी. पाटील, सुहास हुद्दार तर पुणे विभागाचे विश्वनाथ पाखरे, गणपती पाटील, सातेरी पाटील, वैराळ सुळकर, भुजंग पाखरे यांसह इतर उपस्थित होते.