For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतवंशीय जोहरान ममदानी न्यूयॉर्क महापौरपदी शपथबद्ध

07:00 AM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतवंशीय जोहरान ममदानी न्यूयॉर्क महापौरपदी शपथबद्ध
Advertisement

शहराचे पहिले भारतीय-अमेरिकन मुस्लीम महापौर

Advertisement

वृत्तसंस्था/न्यूयॉर्क

भारतीय वंशाचे जोहरान ममदानी न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लीम महापौर बनले आहेत. त्यांनी गुरुवारी कुराणावर हात ठेवून पदाची शपथ घेतली. आतापर्यंत, बहुतेक न्यूयॉर्क शहराच्या महापौरांनी बायबलवर हात ठेवून शपथ घेतली आहे. तथापि, संविधान शपथ घेण्यासाठी कोणत्याही धार्मिक ग्रंथाचा वापर करण्यास बंधनकारक नाही. 34 वर्षीय डेमोक्रॅट ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लीम, पहिले दक्षिण आशियाई आणि पहिले आफ्रिकन वंशाचे महापौर ठरले आहेत. त्यांनी न्यूयॉर्क शहराच्या सिटी हॉलखालील एका बंद सबवे स्टेशनमध्ये शपथ घेतली. हा एक खासगी समारंभ होता. त्यामध्ये ममदानी यांच्या कुटुंबाची उपस्थिती होती. त्यानंतर दुपारी सार्वजनिक शपथविधी समारंभ पार पडला.

Advertisement

भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक उमेदवार जोहरान ममदानी हे ‘मान्सून वेडिंग’ आणि ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटांच्या दिग्दर्शिका मीरा नायर यांचे पुत्र आहेत. ममदानी हे गेल्या 100 वर्षात न्यूयॉर्कचे सर्वात तरुण, पहिले भारतीय-अमेरिकन आणि पहिले मुस्लीम महापौर ठरले आहेत. आपल्या विजयी भाषणात त्यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री दिलेल्या जवाहरलाल नेहरूंच्या ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ भाषणाचा संदर्भ दिला होता. भाषणानंतर, ते आपल्या पत्नीसोबत ‘धूम मचाले’ गाण्यावर नाचताना दिसले होते. तसेच त्यांची आई मीरा नायर स्टेजवर आल्यावर त्यांनी आईला मिठी मारली. याप्रसंगी त्यांचे वडील महमूद ममदानी हेदेखील उपस्थित होते.

निवडणूक प्रचारादरम्यान, ममदानी यांनी महागाईला एक प्रमुख मुद्दा बनवले होते. त्यांनी त्यांच्या धार्मिक श्रद्धा देखील उघडपणे व्यक्त केल्या होत्या. त्यांनी डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये 67 वर्षीय माजी गव्हर्नर अँड्य्रू कुओमो यांचा पराभव केला होता. ही निवडणूक केवळ न्यूयॉर्कच्या महापौरपदासाठी नव्हती, तर डेमोक्रॅटिक पक्षातील वैचारिक आणि पिढीजात संघर्षाची एक मोठी परीक्षा होती. या निवडणुकीत ममदानी यांनी 9,48,202 मते (50.6 टक्के) मिळवून एनवायसीच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली. कुओमो स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहिले आणि त्यांना ट्रम्पचा पाठिंबा होता. कुओमो यांना 7,76,547 मते (41.3 टक्के) मिळाली, तर स्लिवा यांना 1,37,030 मते मिळाली होती.

Advertisement
Tags :

.