‘जॉन्सन अँड जॉन्सन’ भरपाई देणार
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन डीसी
बेबी पावडरची निर्माती कंपनी असणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सनने 550 कोटी डॉलर्सची भरपाई देण्याचे मान्य केले आहे. ही भरपाई अशा कुटुंबांना दिली जाणार आहे, ज्यांनी या पावडरच्या उपयोगामुळे ओव्हरीचा कर्करोग झाल्याची तक्रार केली आहे. या तक्रारी अमेरिकेत करण्यात आल्या होत्या. ही भरपाई 95 टक्के तक्रारदारांनी स्वीकारली आहे, असे प्रतिपादन कंपनीने केले आहे. या संबंधीचा न्यायालयीन संघर्ष गेली 10 वर्षे चाललेला होता. आता कंपनीने तक्रारदारांशी तडजोड केल्याने हा संघर्ष संपुष्टात आला आहे. जवळपास 76 हजार तक्रारदारांनी कंपनीच्या विरोधात फेडरल न्यायालयांमध्ये आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये भरताईसाठी अभियोग सादर केले आहेत. आता या तडजोडीमुळे ते संपणार आहेत. आपली उत्पादने अत्यंत सुरक्षित आहेत, असे आग्रही प्रतिपादन या कंपनीने या न्यायालयीन प्रकरणांचा प्रारंभ झाल्यानंतर केले होते. आमच्या उत्पादनांमध्ये कोणतीही त्रुटी नाही. तरीही न्यायालयीन संघर्ष संपावा, यासाठी आम्ही ही तडजोड स्वीकारली आहे, असे या कंपनीने निर्णयानंतर स्पष्ट केले.