सीआयए प्रमुखपदी जॉन रॅटक्लिफ
जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तचर यंत्रणेची धुरा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉन रॅटक्लिफ यांना सीआयएचे संचालक म्हणून नियुक्त केले आहे. सिनेटमध्ये यासंबंधी झालेल्या मतदानात रॅटक्लिफ यांच्या बाजूने 74 तर विरोधात 25 सिनेटर्सनी मतदान केले आहे. रॅटक्लिफ यांनी यापूर्वी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळात ते नॅशनल इंटेलिजेन्सचे प्रमुख होते. ट्रम्प यांच्या सर्वात निकटवर्तीयांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते.
रॅटक्लिफ हे वकील असून अमेरेकच्या हीथ शहराचे महापौर राहिले आहेत. 2004-12 पर्यंत ते या शहराचे महापौर होते. 2014 साली ते अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात निवडून आले हेत. यानंतर 28 जुलै 2019 रोजी तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना नॅशनल इंटेलिजेन्स प्रमुख म्हणून नेमले होते. त्यानंतर जो बिडेन यांनी स्वत:च्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात रॅटक्लिफ यांना या पदावरून हटविले होते. आता ट्रम्प यांनी रॅटक्लिफ यांना जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तचर यंत्रणा सीआयएचे संचालक म्हणून नेमले आहे.
हिलरी क्लिंटन यांचे आरोप खोटे असल्याचे उघड करणारे, एफआयएसए कोर्टात एफबीआयकडुन नागरी स्वातंत्र्याचा दुरुपयोग दाखवून देणारे जॉन रॅटक्लिफ नेहमीच अमेरिकेच्या जनतेसोबत सत्य आणि प्रामाणिकपणाचे योद्धे राहिले आहेत. जेव्हा 51 गुप्तचर अधिकारी हंटर बिडेन यांच्या लॅपटॉपविषयी खोटं बोलत होते, तेव्हा केवळ जॉन रॅटक्लिफ अमेरिकेच्या जनतेला सत्य सांगत होते. जॉन आमच्या देशाच्या दोन सर्वात मोठ्या गुप्तचर पदांवर सेवा बजावणारे पहिले व्यक्ती ठरणार आहेत. ते सर्व अमेरिकन नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांसाठी एक निडर योद्धा ठरतील. तसेच राष्ट्रीय सुरक्षेची उच्च पातळी आणि शक्तिद्वारे शांतता सुनिश्चित करतील असे उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहेत.