बँक घोटाळ्यावर चित्रपट आणणार- जॉन अब्राहम
अभिनेता जॉन अब्राहम मागील काही काळापासून सत्यघटनांवर आधारित चित्रपटांना प्राधान्य देत आहे. आता जॉन 55 वर्षांपूर्वी झालेल्या एका बँक घोटाळ्याची कहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहे. मागील वर्षी प्रदर्शित ‘द डिप्लोमॅट’ चित्रपटानंतर दिग्दर्शक शिवम नायर तसेच अभिनेता जॉन यांची जोडी पुन्हा एकदा वास्तविक घटनेवर आधारित चित्रपट निर्माण करणार आहे. यावेळी दोघेही 1971 साली दिल्लीत झालेल्या नागरवाला घोटाळ्यावर आधारित चित्रपट निर्माण करतील.
या चित्रपटात जॉनसोबत के.के. मेनन यांची महत्त्वाची भूमिका असेल. याची पटकथा पूर्ण झाली असून निर्मितीपूर्व काम वेगाने सुरू आहे. जॉन आणि के.के. मेनन यांच्या तारखाही ठरल्याने चित्रिकरण 9 ऑक्टोबरपासून सुरू केले जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती तनुज गर्ग आणि अतुल कसबेकर करत आहेत. चित्रिकरण दिल्लीतच पार पाडण्याची याजना आहे.
नागरवाला घोटाळा दिल्लीत 24 मे 1971 रोजी एसबीआयच्या संसद मार्ग शाखेत झाला होता. तेथे चेकशिवाय रुस्तम सोहराब नागरवालाने 60 लाख रुपयांची रोख रक्कम बँकेतून काढली होती. या प्रकरणाच्या तपासात बँक कॅशियरकडे आलेल्या एका फोन कॉलमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच त्यांचे सचिव पी.एन. हक्सर यांच्या आवाजात एका गोपनीय अभियानासाठी 60 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तर फोन कॉलवर तो आवाज नागरवाला यानेच काढला होता. 1972 साली त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. जॉन आगामी काळात दिग्दर्शक रोहित शेट्टीचा चित्रपट ‘मारिया आयपीएस’मध्ये दिसून येणार आहे. यात तो मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भूमिका साकारत आहे. याचे चित्रिकरण जवळपास पूर्ण होत आले आहे.