जो रुट, ब्रूकची नाबाद अर्धशतके
पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ 45 षटकांचा खेळ : इंग्लंडच्या 3 बाद 211 धावा
वृत्तसंस्था/ सिडनी
पावसाचा व्यत्यय आणि खराब प्रकाशामुळे सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या अॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी केवळ 45 षटकांचा खेळ झाला. जो रुट आणि हॅरी ब्रूकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या दिवशी 3 बाद 211 धावा केल्या. रुट 72 तर ब्रूक 78 धावांवर खेळत होते. दुसऱ्या दिवशी सोमवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 4.30 वाजता खेळ सुरु होईल.
प्रारंभी, इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 57 धावांतच त्यांचे तीन बळी पडले होते. सलामीवीर झॅक क्रॉलीला नेसरने 16 धावांवर बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर अनुभवी बेन डकेटही फारसा चमत्कार दाखवू शकला नाही. त्याने 5 चौकारासह 27 धावांचे योगदान दिले. त्याला स्टार्कने तंबूचा रस्ता दाखवला तर जेकब बेथेलला बोलँडने माघारी पाठवले. त्याने केवळ 10 धावा केल्या.

रुट, ब्रूकची दीडशतकी भागीदारी
57 धावांत 3 बळी गेल्यानंतर अनुभवी जो रुट आणि हॅरी ब्रूक यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनीही संघाची धुरा सांभाळताना एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. याशिवाय, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा यशस्वी सामना करताना दीडशतकी भागीदारी साकारली. रुट आणि ब्रूक या दोघांनीही अर्धशतके साजरी केली. रुटने 103 चेंडूचा सामना करताना 8 चौकारासह नाबाद 72 धावा फटकावल्या तर ब्रूकने 92 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 78 धावांचे योगदान दिले. या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लिश संघाने 45 षटकांत 3 बाद 211 धावा केल्या होत्या. या दरम्यान, पावसाला सुरुवात झाली आणि यानंतर सामन्याचा खेळ होऊ शकला नाही. पाऊस आणि खराब प्रकाश यामुळे पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. दिवसअखेरीस रुट 72 तर ब्रूक 78 धावांवर नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, नेसर आणि बोलँडने प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव 45 षटकांत 3 बाद 211 (झॅक क्रॉली 16, बेन डकेट 27, जेकब बेथेल 10, जो रुट खेळत आहे 72, हॅरी ब्रूक खेळत आहे 78, नेसर, स्टार्क आणि बोलँड प्रत्येकी 1 बळी).
जो रुटचे 67 वे कसोटी अर्धशतक
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे सुरू असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात आणखी एक अर्धशतक झळकावले आहे. या अर्धशतकासह तो आता सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमापासून फक्त एक पाऊल दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रुटने नाबाद 72 धावांची खेळी साकारताना कसोटी कारकिर्दीतील 67 वे अर्धशतक साजरे केले. या अर्धशतकासह, रूटने वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू शिवनारायण चंद्रपॉलला (66 अर्धशतके) मागे टाकले आहे. आता, या यादीत रूटच्या पुढे सचिन तेंडुलकर आहे, रूट आणि सचिनमधील अंतर आता फक्त एका अर्धशतकाचे आहे.
कसोटीत सर्वाधिक अर्धशतक झळकावणारे फलंदाज
- सचिन तेंडुलकर - 68 अर्धशतके
- जो रुट - 67 अर्धशतके
- शिवनारायण चंदरपॉल - 66 अर्धशतके
- राहुल द्रविड - 63 अर्धशतके
- अॅलन बॉर्डर - 63 अर्धशतके.