निर्जन बेटावर जॉब, 26 लाख पगार
एका बेटावर कुठलीच वस्ती नाही तसेच तेथे स्थायी स्वरुपात कुणीच राहत नाही. एकप्रकारे पूर्णपणे निर्जन बेटावर एक चांगला जॉब उपलब्ध आहे. तेथे कुठलीच वस्ती नाही, उद्योगधंदे नाहीत, तसेच कुणीच तेथे राहत नाही, मग अखेर तेथे काम काय करावे लागणार असा प्रश्न विचारला जात आहे. स्कॉटलंडच्या या सुंदर परंतु निर्जन बेटावर जॉबसाठी अर्ज मागविले जात आहेत. तेथे मॅनेजर पद भरले जाणार आहे. स्कॉटलंडच्या या बेटाचे नाव हांडा असून तेथे मॅनेजर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या नोकरीसाठी घरही उपलब्ध करविण्यात येणार असून वार्षिक पगार सुमारे 26 लाख रुपये असणार आहे. हांडा बेटा स्कॉटलंडच्या दुर्गम वेस्ट कोस्टवर आहे. हे बेट युरोपमधील सर्वात महत्त्वपूर्ण सागरी पक्षी प्रजनन स्थळांपैकी एक आहे. येथे समुद्र किनारी उंच-उंच खडक आणि आकर्षक नैसर्गिक दृश्यं पहायला मिळतात, या बेटावर तरबेट येथून एका नौकेच्या माध्यमातून पोहोचता येते.
काय करावे लागणार काम
ही नोकरी स्कॉटिश वाइल्डलाइफ ट्रस्टकडून दिली जात आहे. हांडा बेट रेंजर म्हणून नियुक्त इसमाला बेटाची देखरेख, तेथे येणाऱ्या 8 हजार वार्षिक पर्यटकांचे व्यवस्थापन आणि पक्षी तसेच अन्य वन्यजीवांची सुरक्षा सुनिश्चित करावी लागेल. याचबरोबर स्वयंसेवकांच्या टीमचे नेतृत्व करावे लागेल आणि त्यांच्या कामाचे वेळापत्रक निश्चित करावे लागेल. या नोकरीसाठी कुठल्याही विशेष पदवीची आवश्यकता नाही, परंतु सागरी आणि स्थलीय नैसर्गिक इतिहासाचे ज्ञान उपयुक्त ठरू शकते. याचबरोबर अर्जदाराकडे वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहन असणेही आवश्यक आहे.
जोडप्यालाही करता येणार अर्ज
नियुक्तीदरम्यान घराची व्यवस्था मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. ही नोकरी मार्चपासून सुरू होत 6 महिन्यांच्या निश्चित कालावधीसाठी असेल. जोडपे देखील या भुमिकेसाठी अर्ज करू शकतात. तसेच मिळून हे काम करू शकतात. आठवड्यातून एकदा बेटावरून मुख्य भूमीच्या स्काउरी गावापर्यंत आवश्यक कामे म्हणजेच कपडे धुणे, खरेदी आणि बँकिंगसाठी प्रवास करण्याची अनुमती असेल.
शहरी जीवनापासून दूर राहण्याची संधी
बेटावर कुठलाही स्थायी रहिवासी नाही, याचमुळे ही नोकरी शहरी धावपळीपासून दूर शांत आणि निसर्गानजीक जीवन जगू इच्छिणाऱ्यांना ही उत्तम संधी ठरू शकते. हांडा बेट पक्ष्यांच्या अनेक दुर्लभ प्रजाती म्हणजेच गिलेमॉट्स, रैजरबिल्स आणि ग्रेट स्कुआसाठी एक जागतिक प्रजननस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथून मिंक व्हेल्स, डॉल्फिन्स अणि ऑर्कास तसेच बास्किंग शार्क यासारख्या सागरी जीवांनाही पाहिले जाऊ शकते.