जो जीता वही सिकंदर!
हा सामना सुरू होण्याअगोदर अहमदाबादची पुनरावृत्ती होणार तर नाही ना अशी एक धाकधूक मनात होती. परंतु तसं काही घडलं नाही. किंबहुना अहमदाबादचा पराभव हा फ्लूकच होता, हे भारतीय संघाने सिद्ध केलं. दरवर्षी आयसीसी इव्हेंट जिंकण्याचा रतिबच भारतीय संघाने टाकलाय. 2024 टी20 वर्ल्डकप. आणि आता 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी. अहमदाबादमधला तो पराभव झाला नसता तर कदाचित आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची हॅट्ट्रिक झाली असती. असो.
सर्वसाधारण क्रिकेटमध्ये विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये स्पिनर्सचा नेहमी बोलबाला राहिलाय. झटपट क्रिकेटमध्ये मात्र स्पिनर्सला बाहुली म्हणून संबोधली जाते. मात्र, या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या स्पिनर्सनी दाखवून दिलं की स्पिनर्सच्या जोरावर आयसीसीचा इव्हेंट जिंकता येतो.
आजच्या सामन्यात सालाबादप्रमाणे ही नाणेफेक रोहित हरला. वॉशिंग पावडरच्या त्या जाहिरातीप्रमाणे ‘कुछ दाग अच्छेही होते है’ या उक्तीप्रमाणे मागील काही दिवसांपासून रोहित नाणेफेक हरत गेला आणि भारतीय संघ मॅच जिंकत गेला. आज न्यूझीलंडची सुरुवात छान झाली होती. परंतु सुरुवातीलाच वरुण चक्रवर्ती संघासाठी आधारस्तंभ बनला. त्यानंतर खऱ्या अर्थाने कुलदीपने मधली फळी कापली. कुलदीप यादवला भारताचा कुलदीपक म्हणायचं की कोहिनूर म्हणायचं या वादात मी आता पडणार नाही. ज्या ज्या वेळी रोहितने त्याच्या हातात चेंडू दिलाय त्या त्या वेळी कुलदीपने नियतीने तथास्तु म्हणावं तसं तथास्तु म्हटलं. विशेषत: रचित रवींद्रला ज्या पद्धतीने मामा बनवलं ते बघून तो ही अवाक् झाला असावा. पूर्ण स्पर्धेत भारतीय स्पिनर्सने खऱ्या अर्थाने खेळपट्टीला वश केलं होतं. खेळपट्टी ही खऱ्या अर्थाने स्पिनर्सची दासी झाली होती. शेवटी भारतीय स्पिनर्सनी या स्पर्धेत जे जे फलंदाज स्वत:ला दादा फलंदाज समजत होते त्यांना जसं नाचवायचं होतं तसं नाचवलं. झटपट क्रिकेटमध्ये ही गोष्ट मात्र सोपी नाहीये. विशेषत: आयसीसीच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. परंतु हे काम मात्र भारतीय स्पिनर्सनी अगदी चुटकीसरशी सोडवलं. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय संघाने हायब्रीड मॉडेल तत्त्वावर या स्पर्धेला नाचवलं. आणि या स्पर्धेत भारतीय स्पिनर्सनी फलंदाजांना नाचवलं हा एक योगायोगच म्हणावा लागेल. 251 धावांचा पाठलाग करताना रोहित आणि शुभमन ज्या पद्धतीने स्पिनर्सना सामोरे गेले ते पाहून आम्ही स्पिनर्सचे दादा आहोत हे सिद्ध केलं. हा सामना सुरू होण्यापूर्वी सुनील गावस्कर सरांनी रोहित शर्माला सल्ला दिला होता. त्या सल्ल्याचं फळ त्याला मिळालं. सुनील गावस्कर सर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाप माणूस का आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा आज रोहितला सावरलं.
राजकारण असो किंवा खेळ भाकरी ही फिरवावीच लागते. परंतु या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मात्र रोहितने अजिबात भाकरी फिरवली नाही. जी भाकरी वाट्याला आली होती तिला पंचपक्वान्नासमान मानून ग्रहण केली. कलियुगात अमृताची चव नेमकी कोणालाच माहीत नाही. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीमधील प्रत्येक विजयाची चव ही अमृतापेक्षा न्यारीच असणार. क्रिकेटमध्ये काही विजय हे नजराणेसारखे असतात. भारताचे या स्पर्धेतील सर्व विजय हे त्यातलेच होते. राजकारणात शंभर टक्के सातत्य काय असतं ते तुम्ही आंध्र प्रदेशमधील प्रादेशिक पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांना विचारा. विधानसभेला आणि लोकसभेला जेवढे उमेदवार उभे होते ते सर्व निवडून आले. हीच गोष्ट रोहित शर्मासाठी लागू होते. मागील काही महिन्यात जेवढे सामने खेळला आहे तेवढे तो विजयी झालाय. पुन्हा एकदा रोहित शर्माचं कौतुक करावंच लागेल. दीड वर्षांपूर्वी 50 षटकांच्या अंतिम सामन्यातील दु:खाश्रू या विजयामुळे पुरते पुसले गेले असतील, यात काही शंका नाही. भारताने 2024 मधील टी20 वर्ल्डकप जिंकला. 2025 मध्ये आता चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि आता 2026 मध्ये होऊ घातलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ जिंकेल हीच आपण अपेक्षा करूया. पुन्हा एकदा टीम इंडियाचं अभिनंदन!