‘जो बूंदसे गयी वो हौदसे नही आती...’
क्षुल्लक कारणावरून आरोग्यमंत्र्यांनी गोवा मेडिकल कॉलेजमधील एका डॉक्टरचा पाणउतारा केला खरा पण या प्रकरणातून ते बरेच पिछाडीवर पडले आहेत. आता त्यांनाही पिछाडी भरून काढण्यासाठी जबरदस्त मेहनत करावी लागणार तसेच जनता ती स्वीकारणार का? हा सवाल आहे.
एका वयस्क रुग्ण महिलेला इंजेक्शन न दिल्याने हा सर्व प्रकार घडला. मुळात इंजेक्शन न दिल्याची तक्रार कुठपर्यंत करावी, याला काही मर्यादा आहे की नाही. एक इंजेक्शन न दिल्याची तक्रार आरोग्यमंत्र्यांपर्यंत केली जाते तर गोमेकॉत गंभीर आजाराशी दोन हात करणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय ऊग्णांनी काय करावे, असा सवाल उपस्थित होत आहे. आरोग्यमंत्र्यांनी सर्वांसमक्ष कॅज्युल्टी विभागाचे मुख्य आरोग्याधिकारी डॉ. ऊद्रेश कुर्टीकर यांना फैलावर घेतले. मंत्री राणे आणि डॉ. ऊद्रेश यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात आरोग्यमंत्री डॉ. ऊद्रेश यांना उभे राहण्यास, मास्क काढण्यास सांगताना दिसतात. मंत्री राणे म्हणाले, ‘जे काही स्पष्टीकरण द्यायचे असेल, ते चौकशी समिती किंवा न्यायालयात द्या. तोपर्यंत निलंबन कायम राहील. त्यांनी डॉक्टरला तात्काळ घरी जाण्याचा आदेश दिला आणि अन्यथा सुरक्षा रक्षकांमार्फत बाहेर काढण्याचाही इशारा दिला होता.
त्यात डॉक्टरांचा अपमान झाला. डॉक्टरांना आपली बाजू मांडण्याचीही संधी दिली नाही. हा संपूर्ण प्रकार जर बंद दरवाजाआड घडला असता तर त्याला कुणी फारसे महत्त्व दिले नसते. त्यात भर म्हणून की काय, हा संपूर्ण प्रकार घडताना एकही पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. असे असताना हे प्रकरण प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचले आणि व्हायरल झाले. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला धक्का बसला.
मंत्री राणे यांच्या या कारवाईचा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय वैद्यकीय महासंघ यांनी तीव्र निषेध केला. ‘फक्त एका पत्रकाराच्या तक्रारीवरून डॉक्टरला ऑन-कॅमेरा झापणे आणि त्याला स्वत:ची बाजू मांडण्याची संधी न देणे, ही मनमानी आहे, असा आरोप संघटनांनी केला आहे. डॉक्टरची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करीत महासंघाने संपाचा इशारा दिला. तसेच आपत्कालीन विभागात बिगर वैद्यकीय व्यक्तींच्या प्रवेशास मज्जाव करण्याची मागणी देखील करण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणाची दिल्लीपर्यंत वैद्यकीय क्षेत्रात गांभीर्याने दखल घेतली गेली. गोवा मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करून आरोग्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. डीनच्या केबिनबाहेर निदर्शने केली.
सोशल मीडियावरून झालेल्या टीकेनंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपले स्पष्टीकरण जारी केले. त्यांनी स्पष्ट केले की, ‘एका ज्येष्ठ महिलेच्या बाजूने उभा राहिलो कारण तिला योग्य वागणूक दिली जात नव्हती. त्यामुळे मला संताप आला. मी सीनियर डॉक्टरशी ज्या प्रकारे संवाद साधला, त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो. अशी घटना पुन्हा घडणार नाही, याची मी हमी देतो.’ तथापि, ज्येष्ठ ऊग्ण महिला रुग्णाच्या बाबतीत आवश्यक ती काळजी घेतली गेली नव्हती म्हणून तिची साथ दिली आणि त्याबाबत मी माफी मागणार नाही, असेही राणे यांनी ठामपणे स्पष्ट केले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोशल मीडियावरून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची तसेच त्यांच्या कुंटुंबियांची माफी मागितली. तरी त्यातून
डॉक्टरांचे समाधान होत नसल्याने शेवटी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेत डॉक्टरांची समजूत काढली व एकूण प्रकरण नियंत्रणात आणले. मुळात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. दोघेही एकमेकांना ‘कांटे की टक्कर’ देत होते. भलेही उघडरित्या याची वाच्यता कुठे करीत नसले तरी याची जाणीव सर्वांना आहे. या शीतयुद्धात सध्यातरी डॉ. प्रमोद सावंत यांनी बाजी मारली, असेच म्हणावे लागेल. खुद्द भाजप पक्षांतर्गत त्यावर चर्चा होताना आढळून येत आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आरोग्य क्षेत्रात चांगली कामगिरी केली होती. त्यांनी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शिस्त आणण्याला प्राधान्य दिले होते. यापूर्वी त्यांनी अचानक भेट देऊन बेशिस्त वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली होती. त्यातून कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण होण्यास मदत झाली होती. गोमेकॉत अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याकडे त्यांचा कल होता. हे कोणीच नाकारू शकत नाही. मंत्री राणे यांच्याकडे असलेल्या अन्न आणि औषध खात्यानेही चांगल्या कामगिरीची नोंद केली आहे. गोव्याबाहेरून आणली जाणारी मिठाई असो किंवा फळे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर, यावर ठोस कृती सुरू ठेवली आहे. त्यांचे सर्वांनी स्वागत केले मात्र त्यांच्याकडे असलेल्या नगरनियोजन खात्यामुळे त्यांना टीकेचा भडीमारही सहन करावा लागत आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या कृतीचे समर्थन करणारे अनेकजण आहेत कारण त्यांना ‘गोमेकॉ’त आलेला वाईट अनुभव कारणीभूत आहे. रुग्णांसाठी डॉक्टर हे देव असतात व त्यांनी देवाप्रमाणेच रुग्णांशी वागावे, अशी त्यांची इच्छा आहे मात्र जो प्रकार घडला तो सर्वांसमक्ष घडायला नको होता, असा सूरही व्यक्त होत आहे.
आता आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे बॅकफूटवर गेलेले आहेत. ते फ्रंटफूटवर येण्यासाठी आपल्यापरिने प्रयत्न करतील मात्र ‘जो बूंदसे गयी वो हौदसे नहीं आती...’, असेच शेवटी म्हणावे लागेल.
महेश कोनेकर