जेएनयु हे ‘टुकडे टुकडे गँग’चे कार्यालय
विद्यापीठातील घोषणाबाजीवर भाजपकडून टीका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ हे देशविरोधी ‘टुकडे टुकडे गँग’चे कार्यालय आहे, अशी कठोर टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. या विद्यापीठात मंगळवारी काही लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात अश्लाघ्य घोषणाबाजी केली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. दिल्लीमध्ये 2020 मध्ये झालेल्या भीषण धार्मिक दंगलीतील आरोपी उमर खालिद आणि शर्जिल इमाम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे ही घोषणाबाजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी या घोषणाबाजीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘तुमची कबर खोदली जाईल’ अशा अर्थाच्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या संदर्भात या विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे एक टोळके करत असल्याचे या व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. या व्हिडीओवर अनेक दर्शकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असल्याचेही पहावयास मिळते.
छात्रसंघ नेत्याकडून समर्थन
या घोषणाबाजीचे समर्थन जेएनयु छात्रसंघ या संघटनेचे अध्यक्ष अतिथी मिश्रा यांनी केले आहे. ही घोषणाबाजी कोणाच्याही विरोधात नाही. हा आमचा वैचारिक विरोध करण्याचा मार्ग आहे. दरवर्षी 5 जानेवारीला विद्यापीठात विरोध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. 2020 पासून ही परंपरा आहे. कारण त्यावर्षी या विद्यापीठात दंगल झाली होती. त्यामुळे हे विरोध प्रदर्शन दरवर्षी करण्यात येते.
काँग्रेसचाही पाठिंबा
दिल्ली दंगलीतील आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. त्यामुळे विद्यापीठातील अनेक विद्यार्थी संतप्त झाले आहेत. या संतापाला वाट मोकळी करुन देण्यासाठी हे विद्यार्थी अशा प्रकारच्या घोषणा देत आहेत, अशा शब्दांमध्ये काँग्रेस नेते उदित राज यांनी या घोषणाबाजीला पाठिंबा व्यक्त केला.
गिरिराज सिंग यांचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश आणि लोकप्रियता पाहून जळणाऱ्यांचा एक वर्ग या देशात आहे. या वर्गाला या देशाविषयी कोणतेही प्रेम किंवा आदर नाही. असे लोक जवाहरलाल नेहरु विद्यापीठात मोठ्या संख्येने आहेत. ते अशी घोषणाबाजी करत असतात. दिल्लीची दंगल ज्यांनी घडविली, ते उमर खालिद आणि शर्जिल इमाम हे या लोकांचे आदर्श आहेत. या दोन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याने या लोकांना नैराश्याने घेरले आहे. त्यामुळे ते अशा घोषणा देत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी मंगळवारी केली आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री कपिल मिश्रा यांनीही घोषणाबाजी करणाऱ्यांना दोष दिला असून अशी प्रवृत्ती देशाला घातक ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.