जेएनयुकडून ‘कुलगुरु’चा स्वीकार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोणत्याही विद्यापीठाच्या प्रमुखांना इंग्रजीत ‘व्हाईस चान्सेलर’ असे संबोधण्याची प्रथा आहे. या इंग्रजी शब्दाच्या स्थानी ‘कुलगुरु’ या संस्कृतप्रचुर किंवा हिंदी शब्दाचा स्वीकार दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने केला आहे. आतापर्यंत या शब्दाला ‘कुलपती’ असा पर्यायी शब्द होता. तथापि, कुलपती हा शब्द लिगंवाचक असल्याने त्याला विरोध होत होता. आता या विद्यापीठाने कुलपती या शब्दाच्या स्थानी ‘कुलगुरु’ हा समतादर्शक शब्द स्वीकारला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने या संबंधीचा प्रस्ताव स्वीकारल्याची माहिती देण्यात आली आहे.
कुलगुरु या शब्दाचा प्रस्ताव या विद्यापीठाच्या व्हाईस चान्सेलर शांतीश्री धुलिपुदी पंडित यांनी विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळासमोर ठेवला होता. तो मंडळाकडून स्वीकारण्यात आला आहे. तथापि, या संबंधीची अधिकृत घोषणा सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर करण्यात येणार आहे. या बैठकीसमोर सध्याच्या व्हाईस चान्सेलर पंडित या हा प्रस्ताव औपचारिकरित्या सादर करणार आहेत. हा प्रस्ताव संमत होणे हा आता केवळ एक उपचार उरला असून तो पार पडल्यानंतर व्हाईस चान्सेलर या शब्दाच्या स्थानी ‘कुलगुरु’ शब्द येणार आहे.