झारखंडमध्ये झामुमो-काँग्रेसचा विजय
सलग दुसऱ्यांदा राखले सरकार, रालोआचा दारुण पराभव, भाजपला अवघ्या 22 जागा
वृत्तसंस्था / रांची
एकीकडे महाराष्ट्रात विरोधी पक्षांच्या आघाडीला प्रचंड पराभवाचे दु:ख पचवावे लागत असतानाच झारखंड राज्याने मात्र या दु:खावर फुंकर घातली आहे. या राज्याच्या विधानसभेच्या 81 जागांपैकी तब्बल 55 जागांवर सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्या युतीने बाजी मारत मोठ्या बहुमताची प्राप्ती केली आहे. या युतीत राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांचाही समावेश होता. झारखंड मुक्ती मोर्चा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्याला 33 जागा मिळाल्या असून काँग्रेसला 16, राष्ट्रीय जनता दलाला 5 तर डाव्या पक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. पुन्हा हेमंत सोरेन हेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
झारखंडमध्ये 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. या दोन्ही टप्प्यांमधील जागांपैकी बहुतेक जागांवर आघाडीचा विजय झाला आहे. मतांच्या टक्केवारीतही आघाडी सरस ठरली असून तिला 44 टक्के मतांची प्राप्ती झाली आहे. भारतीय जनता पक्षाला या राज्यात पुन्हा विरोधी पक्षात बसावे लागणार असून या पक्षाला 22 जागा मिळाल्या आहेत. या पक्षाचे मित्रपक्ष असणाऱ्या ऑल झारखंड विद्यार्थी संघटना, संयुक्त जनता दल आणि लोकजनशक्ती या पक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. या पक्षांनी अनुक्रमे 10, 2 आणि 1 जागा लढविली होती. तथापि, केवळ ऑल झारखंड विद्यार्थी संघटना या पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांची आघाडी प्रथम पासूनच आघाडीवर होती. मतगणनेच्या प्रथम फेरीपासून आघाडीच्या अनेक उमेदवारांनी मताधिक्क्य घेऊन ते शेवटपर्यंत टिकविले होते. मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक सर्व मंत्री विजयी झाले आहेत. या आघाडीने मागच्या निवडणुकीपेक्षाही या निवडणुकीत 10 जागा अधिक मिळविल्या आहेत.
चंपाई सोरेन विजयी
विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधी काही काळ झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि हेमंत सोरेन कारागृहात गेल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा भार सांभाळलेले चंपाई सोरेन सराईकेल मतदारसंघातून विजयी झाले आहेत. या मतदारसंघात ते 18624 च्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. विरोधी पक्षनेते बाबुलाल मरांडी यांनीही विजय मिळविला आहे. तर डुमरी मतदारसंघात झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे उमेदवार जयराम महतो हे निवडून आले आहेत.
पत्नीला श्रेय
या विजयाचे श्रेय हेमंत सोरेन यांनी आपली पत्नी कल्पना यांना दिले आहे. कल्पना सोरेन यांनी प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली. तसेच प्रचाराची रणनीती ठरवितानाही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिल्यामुळे हा विजय शक्य झाला. कल्पना सोरेन यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचाही प्रचार करण्यात पुढाकार घेतला, अशा शब्दांमध्ये हेमंत सेरेन यांनी त्यांची प्रशंसा केली.
राहुल गांधी यांच्याकडून प्रशंसा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंड विजयासंबंधी प्रतिक्रिया देताना कार्यकर्त्यांचे तसेच मतदारांचे आभार मानले आहेत. या राज्यातील लोकांनी विरोधी पक्षांच्या आघाडीला मोठे बहुमत देऊन विश्वास व्यक्त केला आहे. आमचे सरकार यापुढे लोकहिताची कामे झपाट्याने करुन लोकांचा विश्वास सार्थ ठरविणार असून राज्याचा विकास करणार आहे, असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले.
बरहेट मतदारसंघात हॅट्ट्रिक
हेमंत सोरेन यांनी स्वत:चा पारंपरिक मतदारसंघ बरहेटमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे. भाजपचे उमेदवार गमालियल हेंब्रम यांना त्यांनी पराभूत केले आहे. बरहेट मतदारसंघात सोरेन यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.
गांडेयमध्ये कल्पना सोरेन यांची सरशी
झारखंडमधील गांडेय मतदारसंघात हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी मुनिया देवी यांना पराभूत केले आहे. गांडेय येथे कल्पना सोरेन आणि मुनिया देवी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत दिसून आली आहे. कल्पना सोरेन यांना आता राज्य सरकारमध्ये मोठे पद दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
जामताडामध्ये इरफान अंसारींचे वर्चस्व
जामताडा मतदारसंघात काँग्रेसचे इरफान अंसारी यांनी विजय मिळविला आहे. या मतदारसंघात अंसारी यांनी भाजपच्या उमेदवार सीता सोरेन यांना पराभूत केले आहे. सीता सोरेन या मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या भावाच्या पत्नी आहेत.
रांची मतदारसंघात भाजपला यश
राज्याची राजधानी असलेल्या रांची मतदारसंघात भाजप उमेदवार चंद्रेश्वर यांनी झामुमोच्या उमेदवार महुआ माजी यांना पराभूत केले आहे. रांची येथे विजय मिळविता आल्याने भाजपला काही प्रमाणात दिलासा मिळू शकला आहे. झारखंडची स्थापना झाल्यापासून म्हणजेच 2005 च्या निवडणुकीपासून भाजपचे मातब्बर नेते चंद्रेश्वर प्रसाद सिंह या मतदारसंघात विजयी होत आले आहेत.
माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा पराभव
माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा या निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. जगन्नाथपूर येथे त्या भाजपच्या उमेदवार होत्या. काँग्रेसचे सोनाराम सिंकू यांनी त्यांचा पराभव केला आहे.