For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झारखंडच्या नव्या सरकारची आज ‘अग्निपरीक्षा’

06:06 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
झारखंडच्या नव्या सरकारची आज ‘अग्निपरीक्षा’
Advertisement

जेएमएम-काँग्रेसचे आमदार हैदराबादहून रांचीला परत

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

झारखंडच्या नव्या सरकारची सोमवारी विधानसभेत ‘अग्निपरीक्षा’ होणार आहे. मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी पूर्ण तयारी केली असून गेल्या चार दिवसांपासून हैदराबादमध्ये असलेले झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे आमदार रांचीला परतले आहेत. आमदारांच्या फोडाफोडीच्या भीतीने जेएमएम आणि काँग्रेसच्या आमदारांना तेलंगणाला पाठवण्यात आले होते. सर्व आमदार मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या संपर्कात असून महाआघाडीने फ्लोअर टेस्टबाबत रणनीती बनवली आहे. चंपई सोरेन आपल्या सरकारची योग्यता सिद्ध करण्यासाठी झारखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणणार आहेत. त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. सरायकेला विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार चंपई सोरेन यांनी झारखंडचे 12वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Advertisement

त्यांच्यासोबत काँग्रेसच्या आलमगीर आलम आणि आरजेडीच्या सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती. झारखंडमधील झामुमो आणि काँग्रेसचे आमदार हैदराबादच्या रिसॉर्टमधून रविवारी दुपारी रांचीला रवाना झाले. हैदराबादच्या लिओनिया रिसॉर्टमध्ये मुक्कामी असलेल्या झामुमो आणि काँग्रेसच्या सुमारे 36 आमदारांना रविवारी एका विशेष बसमधून बेगमपेट विमानतळावर आणण्यात आले. सायंकाळी ते रांची विमानतळावर पोहोचल्यानंतर आमदारांना रविवारची रात्र सुरक्षित असलेल्या रिसॉर्टवर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. तत्पूर्वी आमदार फोडण्यापासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहेत. यापूर्वी आमदारांच्या सुरक्षेसाठी रांची ते हैदराबादपर्यंत विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सर्किट हाऊस येथून त्यांना बसने रांची विमानतळावर नेल्यानंतर त्यांना एका विशेष चार्टर्ड विमानाने हैदराबादला नेण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.