झामुमो, काँग्रेसने लुटल्या जनतेच्या सुविधा
झारखंडमध्ये पंतप्रधान मोदींचा शाब्दिक घणाघात
वृत्तसंस्था/ रांची
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी जाहीर सभा घेतली आहे. तसेच एक मेगा रोड शो केला आहे. बोकारो येथील सभेला संबोधित करताना मोदींनी झामुमो अन् काँग्रेसला लक्ष्य केले आहे. झारखंडमध्ये भाजपच्या बाजूने वादळ येणार आहे. आम्हीच झारखंडची निर्मिती केली असून आम्हीच त्याला विकसित करणार आहोत, हाच भाजप-रालोआचा मंत्र आहे. झारखंडच्या निर्मितीला विरोध करणारे लोक कधीच राज्याचा विकास करू शकणार नाहीत असे म्हणत मोदींनी काँग्रेस, राजदला लक्ष्य केले.
10 वर्षांपूर्वी 2004-14 पर्यंत केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, मॅडम सोनिया सरकार चालवत होत्या आणि मनमोहन सिंह यांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसविण्यात आले होते. त्या काळात केंद्र सरकारने झारखंडला 10 वर्षांमध्ये फार तर 80 हजार कोटी रुपयांचा निधी दिला. 2014 नंतर दिल्लीत सरकार बदलले आणि जनतेचा सेवक म्हणून मोदील सेवा करण्याची संधी मिळाली. मागील 10 वर्षामध्ये आम्ही झारखंडला 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी प्रदान केल्याचा दावा मोदींनी केला आहे.
गरीबाला पक्के घर मिळावे, शहरे-गावांमध्ये चांगले रस्ते निर्माण व्हावेत, वीज-पाणी मिळावे, उपचाराची सुविधा असावी, शिक्षणाची सुविधा असावी, सिंचनासाठी पाणी मिळावे. वृद्धत्वात औषधे उपलब्ध व्हावीत अशी भाजपची इच्छा आहे. परंतु झामुमो सरकारच्या मागील 5 वर्षांच्या कार्यकाळात जनतेच्या या हक्काच्या सुविधा झामुमो आणि काँग्रेसच्या नेत्यांना लुटल्याची टीका मोदींनी केली आहे.
भ्रष्टाचाऱ्यांना कठोर शिक्षा
सामान्य लोक मूठभर वाळूसाठी व्याकूळ होत असताना झामुमो अन् काँग्रेसचे नेते वाळूची तस्करी करून कोट्यावधी रुपये कमावत आहेत. या नेत्यांच्या घरातून नोटांचा ढिग जप्त होत आहे. आता जनतेने भाजप-रालोआ सरकार सत्तेवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार स्थापन झाल्यावर भ्रष्ट झामुमो-काँग्रेसच्या नेत्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी म्हणून आम्ही न्यायालयात पूर्ण लढाई लढणार आहोत. जनतेच्या हक्काचा पैसा जनतेवरच खर्च होईल असे मोदी म्हणाले.
केंद्राकडून भरीव निधी
आम्ही पीएम किसान सन्मान निधीचा पैसा थेट झारखंडच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करत आहोत. अशाचप्रकारे महामार्ग, रेल्वे आणि विमानतळांच्या निर्मितीकरता केंद्र सरकार थेट खर्च करत असल्याने कुणाला कमिशन घेण्याची संधी मिळत नाही. झारखंडमध्ये देखील आमच्या सरकारने लाखो कोट्यावधी रुपये खर्च पेले आहेत असा दावा मोदींनी केला.
नव्या उद्योगांना प्रोत्साहन
भाजप-रालोआ सरकार नव्या उद्योगांना प्रोत्साहन देत आहे. आम्ही झारखंडमध्ये बंद पडलेल्या जुन्या कारखान्यांना पुन्हा सुरू करणार आहोत. सिंदरीचा खत प्रकल्प पूर्वीच्या सरकारांच्या गैर धोरणांमुळे बंद पडला होता. आम्ही सिंदरीचा खत प्रकल्प पुन्हा सुरू करविला. यामुळे झारखंडच्या हजारो युवांना रोजगार मिळाला आहे. झारखंडमध्ये झामुमो-काँग्रेसने पेपर लीक आणि भरती माफिया निर्माण केले असून त्या सर्वांवर प्रहार केला जाणार आहे. झारखंडच्या माताभगिनींचे जीवन सुकर व्हावे हीच माझी प्राथमिकता असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
काँग्रेस-झामुमोकडून मोठा कट
आता झारखंडमध्ये भाजपने ‘गोगो दीदी योजने’चे आश्वासन दिले आहे. झारखंडच्या माताभगिनींच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जाणार आहेत. झारखंडच्या जलद विकासासाठी सर्वांच प्रयत्न म्हणजेच सामूहिक शक्ती वापरली जाणे आवश्यक आहे. याचमुळे जनतेला काँग्रेस-झामुमोच्या एका मोठ्या कटापासून सतर्क रहावे लागणार असल्याचे वक्तव्य पंतप्रधानांनी केले आहे.
एक रहेंगे तो सेफ रहेंगे
काँग्रेस आता ओबीसींच्या सामूहिक शक्तीत फूट पाडू पाहत आहे. या शक्तीला तोडून काँग्रेस ओबीसींना शेकडो वेगवेगळ्या जातींमध्ये विभागू पाहत आहे. समाज विखुरला जावा, छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विभागला जावा असे कुणालाच वाटत नाही. याचमुळे ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ हे नेहमीच आम्हाला आठवणीत ठेवावे लागणार असल्याचे मोदी म्हणाले.