बांगलादेशात दुर्गापुजेवर ‘जिझिया कर’
वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेशात दुर्गापूजा उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच हा उत्सव साजरा करायचा असेल तर प्रत्येक दुर्गापूजा मंडळाला 5 लाख रुपयांचा जिझिया कर भरावा लागेल असा आदेश तेथील सरकारने काढल्याची माहिती सरकारच्याच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे हा देश आता कट्टर इस्लामी देश होण्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहे, असे दिसून येत आहे.
यंदा प्रथमच या देशातील हिंदूंना दुर्गापूजा करण्याला अनुमती देण्यात आलेली नाही. तसेच अनेक स्थानी दुर्गामातेच्या मूर्तींची विटंबना करण्यात आली आहे. पोलिसांनी यावर कारवाई केली नाही, अशी हिंदूंची तक्रार आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरेशी नसल्याचे कारण दाखवत दुर्गापूजा उत्सव आणि नवरात्र साजरे करण्यावर बंदी घातली. तसेच पूजा मंडळांना नमाज पठणाच्या काळात संपूर्ण शांतता पाळण्याचा आदेश देण्यात आला आहे. गुरुवारी या देशातील प्रसिद्ध किशोरगंज बत्रिश गोपीनाथ आखाड्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या दुर्गामातेच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. कोमिला जिल्ह्यातही नव्या दुर्गामूर्तीची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
मंडळांवर जिझिया कर
महत्त्वाच्या सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गापूजा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करायचा असल्यास हिंदू मंडळांना 5 लाख रुपयांचा जिझिया कर द्यावा लागणार आहे. हा कर इस्लामी राजवटीतील देशांमध्ये राहणाऱ्या बिगर इस्लामी लोकांवर लादण्यात येतो. त्यामुळे प्रत्येक वर्षी दुर्गापूजा उत्सव साजरा करणाऱ्या असंख्य मंडळांनी यावर्षी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशीही माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली.
पाच देशांमधील उच्चायुक्त माघारी
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने पाच देशांमधील आपले राजदूत किंवा उच्चायुक्त माघारी बोलाविले आहेत. ब्रुसेल्स, कॅनबेरा, नवी दिल्ली आणि संयुक्त राष्ट्रसंघ येथील अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. अद्याप या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तथापि, ती लवकरच करण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली. भारतानेही या बाबींची गंभीर दखल घेतली आहे.