जितोच्या रक्तदान शिबिराने रचला विक्रम
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) संस्थेने बेळगावच्या इतिहासात नवा विक्रम नोंदविला आहे. जितोतर्फे गेल्या सात वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या मेगा रक्तदान शिबिरात यंदा एकाच दिवशी व एकाच ठिकाणी तब्बल 1 हजार 211 युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले.
बेळगाव येथील महावीर भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, एका व्यक्तीने केलेल्या रक्तदानामुळे तब्बल तीन व्यक्तींचे प्राण वाचविण्यास मदत होऊ शकते. गेल्या सात वर्षांपासून जितो संस्थेतर्फे सातत्याने मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करून बेळगाव शहरातील रक्ताची गरज भागविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले जात आहे.
यावेळी व्यासपीठावर अॅड. रविराज पाटील, रतन रामगोंडा, के. व्ही. मनोहर, रघुराम, डॉ. एस. नागराज आदी उपस्थित होते. रक्त संकलनासाठी केएलई ब्लड बँक, बिम्स ब्लड बँक, महावीर ब्लड बँक आणि बेळगाव ब्लड बँक यांच्यासह प्रमुख रक्तपेढ्यांनी सहभाग घेतला. बेळगाव शहरातील विविध संघ-संस्था, युवक मंडळे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वेच्छेने रक्तदान केले.
उत्स्फूर्त सहभागामुळे एकाच दिवशी 1 हजार 211 युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले. यावेळी जितोचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संयोजक महेंद्र परमार यांनी प्रास्ताविक केले. सचिव अभय आदिमनी यांनी आभार मानले.