दोन दिवसीय हर्षोत्सव कार्यक्रमाचे जितोतर्फे आयोजन
बेळगाव : अनेक वर्षांपासून विविध सामाजिक कार्य करणाऱ्या जितो संस्था बेळगावच्यावतीने व जितो केकेजी झोनच्या सहकार्याने 9 व 10 मे रोजी केएलई सेंटेनरी हॉलमध्ये दोन दिवसीय जितो हर्षोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती जितोचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंगळवारी शहरातील नामांकित हॉटेलमध्ये जितोतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते म्हणाले, जितो संस्था दरवर्षी आरोग्य तपासणी शिबिरे आणि रक्तदान शिबिरांसह सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करते. जितो हर्षोत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना अधिक ज्ञान देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ व्याख्यात्यांना आमंत्रित केले आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रम समन्वयक विक्रम जैन म्हणाले, उद्घाटन सोहळा 9 मे रोजी सकाळी 10 वा. आयोजित केला आहे. राष्ट्रीय व्यवसाय विकास परिषदेचे अध्यक्ष सुनील शिंगी कार्यक्रमाचे उद्घाटन करतील व त्यानंतर त्यांचे व्याख्यान होईल. जितो अपेक्सचे पदाधिकारी उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले. दुपारी शानदार शांतीभाई विविध क्षेत्रातील खऱ्या कथांची माहिती देतील. जादूगार विवेक शिंगी जादुचे प्रात्यक्षिक सादर करतील. सायंकाळी 7 वा. प्रसिद्ध भक्ती गायक विवेक डी. पारेख आणि त्यांच्या टीमतर्फे भक्तीसंगीत कार्यक्रम सादर केला जाईल.
10 मे रोजी सकाळी प्रसिद्ध आध्यात्मिक व्याख्याते कृषी नंदा दैवी शक्ती आणि महिला स्वातंत्र्य या विषयावर व्याख्यान देतील. त्यानंतर कृष्णा राठी वैयक्तिक आणि व्यावसायिक ब्रँड उभारणीबद्दल माहिती देणार आहेत. निवृत्त आयएफएस अधिकारी, भारतीय राजनैतिक अधिकारी आणि केंद्र सरकारचे सल्लागार डॉ. दीपक वोरा ‘जामवंत प्रभाव इंडिया कसा भारत बनतो’ या विषयावर बोलतील. दुपारच्या सत्रात राहुल कपूर ‘आयुष्यात सर्व काही शक्य आहे’ या विषयावर बोलणार आहेत. यानंतर तरुण यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती घेण्यात येतील. या कार्यक्रमांना प्रवेश निमंत्रण पासवर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी जितोचे सेक्रेटरी अभय आदिमानी उपस्थित होते.