सरकारच्या चुकीमुळे 26 जण जीवाशी मुकले, शहांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारावी : आव्हाड
मुंबईवरील हल्ल्याची करुन दिली आठवण, कठोर भूमिका घेतल्यास आम्ही सरकारसोबत
रत्नागिरी : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्यावेळी कोणतीही सुरक्षा पर्यटकांना नव्हती. आतंकवादी येतात व निघून जातात, हे सुरक्षा यंत्रणांचे अपयश आहे. सरकारच्या चुकीमुळे 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावेळी गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरल्याचा ठपका ठेवून तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचा राजीनामा भाजपने मागितला होता. आता तीच नैतिकता केंद्रीय गृहमंत्र्यांनी दाखवायला हवी, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने रत्नागिरीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यासाठी रत्नागिरीत आलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. पहलगाम येथे हल्ला झाल्यानंतर दोन तासानंतर सैनिक त्या ठिकाणी पोहोचले. सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा सर्व प्रकार धक्कादायक आहे. या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी सरकारची आहे. 26/11 मुंबई हल्ल्यानंतर मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी राजीनामे दिले होते, असे आव्हाड यांनी सांगितले.
पहलगाम हल्ल्यानंतर धार्मिक द्वेश पसरविण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आले. देशात सर्व गुण्यागोविंदाने राहत असताना राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार केला जात आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी विविध मुद्दे उपस्थित केले जात आहेत. जनतेची सुरक्षा करणे, हे सरकारचे काम आहे. सरकारने कोणतीही भूमिका घ्यावी, आम्ही त्यांच्यासोबत राहू, मात्र प्रश्न विचारण्याचा आम्हांला अधिकार आहे. एवढा हल्ला झालाच कसा, याचे उत्तर सरकारने द्यायला हवे, असे आव्हाड म्हणाले.
राज्यावर सध्या 9 लाख कोटी कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. प्रत्येक नागरिकावर जवळपास दीड लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे सरकार लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे. अर्थमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा आपण केलीच नव्हती, असे सांगतात. त्यामुळे सरकारला पाशवी बहुमत मिळाले असून जनतेची गरज आता संपली असल्याची टीका आव्हाड यांनी यावेळी केली.
सरकारचे मंत्री जातीय द्वेश पसरवत आहेत. संविधानाची शपथ घेवून आपण मंत्री झाला आहात, याचा त्यांना विसर पडला आह़े सर्वोच्च न्यायालयावर टीका करण्यापर्यंतचे धाडस मंत्री करत असून आपल्या मर्यादांचा त्यांना विसर पडला आहे. भाजपचे लोक तर्क समजून घेत नाहीत. केवळ धार्मिक विद्वेश पसरविणे एवढेच काम केले जात आहे. महागाई आज गगनाला भिडली आहे. बेरोजगारी वाढली आहे. त्याकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही, असे आव्हाड यांनी सांगितले.
न्यायव्यवस्थेतही आरक्षण असले पाहिजे: आव्हाड
जातीनिहाय जनगणना करण्याला आमचा कायमच पाठिंबा राहिला आहे. तसेच जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी भागीदारी या काशिराम यांच्या न्यायाने संपत्तीचे वाटप झाले पाहिजे. न्यायव्यवस्थेतही आरक्षण असले पाहिजे. राज्यात सरकारला पेट्या पोहचत असल्याने यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत, अशी टीका आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली.