For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

''एका पराभवाने सत्ताधारी सैरभैर; कोल्हापूर करांनो लक्षात घ्या, ही वेळ "कंडका पाडायची आहे..!" गोकुळवरील शासन नियुक्त संचालकांवरून आव्हाड आक्रमक

04:52 PM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
  एका पराभवाने सत्ताधारी सैरभैर  कोल्हापूर करांनो लक्षात घ्या  ही वेळ  कंडका पाडायची आहे     गोकुळवरील शासन नियुक्त संचालकांवरून आव्हाड आक्रमक
Advertisement
मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या निवडणुकीतील निकालानंतर आता शासन नियुक्त संचालकांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने 13-12 अशा फरकाने विजय मिळवला असताना, राज्य मंत्रिमंडळाने गोकुळमध्ये 4 शासन नियुक्त तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या निर्णयाला मंजुरी दिल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवूनही जनमताच्या जोरावर सतेज पाटील यांच्या गटाने विजय मिळवला. मात्र, हा पराभव सत्ताधाऱ्यांना स्वीकारता आलेला दिसत नसल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.
सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत आव्हाड यांनी शासन नियुक्त संचालकांच्या माध्यमातून गोकुळच्या सत्तासमीकरणात बदल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला. या 4 सदस्यांना मतदानाचा अधिकार दिल्यास अध्यक्षपदाच्या निवडीतही त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. या निर्णयाकडे कोल्हापूरकरांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Advertisement

‘लोकशाहीचा मुडदा पाडण्याचा प्रयत्न’

लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन करणारे सत्ताधारी एका पराभवामुळे अस्वस्थ होऊन लोकशाही प्रक्रियेला बाधा आणत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. कोल्हापूर ही शाहू महाराजांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांची भूमी असल्याचे सांगत, अशा निर्णयांना जनतेने विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयावरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी यांच्यात संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. या निर्णयामुळे संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीत नवे राजकीय समीकरण निर्माण होणार का, याकडे आता कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement

‘गोकुळ’च्या सत्तासंघर्षात शासन नियुक्त संचालकांचा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता असून, आगामी अध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.