‘जिओ’चा आयपीओ 2025 पर्यंत येणार
कंपनी 9.3 लाख कोटी उभारण्याचे संकेत : जिओचे 48 कोटींहून अधिक ग्राहक
वृत्तसंस्था /मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे टेलिकॉम युनिट जिओ पुढील वर्षी म्हणजे 2025 पर्यंत आयपीओ लाँच करू शकते. अमेरिकन ब्रोकरेज जेफरीजच्या मते, या आयपीओद्वारे कंपनी 112 अब्ज डॉलर्स (सुमारे 9.3 लाख कोटी) पेक्षा जास्त रक्कम उभारु शकते. याचसोबत जिओची दूरसंचार क्षेत्रातील ग्राहकसंख्या आता 48 कोटीहून अधिक झाली आहे.
समभाग वधारण्याची चिन्हे
ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, या आयपीओमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमतीत 7 टक्के-15 टक्के वाढ होऊ शकते. जेफरीजने रिलायन्सच्या समभागांना 3,580 च्या लक्ष्यासह ‘बाय’ रेटिंग दिले आहे. या वर्षात आतापर्यंत रिलायन्सच्या शेअर्समध्ये 22 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. निफ्टी निर्देशांकापेक्षा ही चांगली कामगिरी आहे, ज्याने या कालावधीत आतापर्यंत 12 टक्के परतावा दिला आहे. ब्रोकरेजने सांगितले की, रिलायन्स जिओला शोध प्रणालीद्वारे स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करेल अशी शक्यता आहे. जिओ फायनान्शियल देखील या प्रक्रियेद्वारे सूचीबद्ध केले गेले. पुढील महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संभाव्य एजीएममध्ये जिओच्या आयपीओबद्दल माहिती दिली जाऊ शकते अशी आशा तज्ञ आणि उद्योगाशी संबंधित लोकांना आहे. रिलायन्सचा आर्थिक सेवा व्यवसाय जुलै-2023 मध्ये त्याच्या मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमधून वेगळा करण्यात आला.
जिओचे 48 कोटींहून अधिक वापरकर्ते
ट्रायने एप्रिलमध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओचे एकूण 484.04 दशलक्ष म्हणजेच 48.40 कोटी ग्राहक आहेत. त्याच वेळी, एअरटेलकडे 275.41 दशलक्ष (27.54 कोटी) ग्राहक आहेत आणि व्होडाफोन आयडियाचे 126.44 दशलक्ष (12.64 कोटी) ग्राहक आहेत. तर, सरकारी मालकीची कंपनी बीएसएनएलचे 24.98 दशलक्ष (2.49 कोटी) ग्राहक आहेत.