जिओचा आयपीओ पुढच्या महिन्यात
सेबीकडे करणार लवकरच अर्ज दाखल : सर्वाधिक मूल्याचा ठरणार
वृत्तसंस्था, मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीज उद्योग समुहाची सहकारी कंपनी रिलायन्स जिओ यांचा आयपीओ पुढील महिन्यात म्हणजेच मे मध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या संदर्भातील अर्जाची कागदपत्रे कंपनी लवकरच शेअरबाजारातील नियामक सेबीकडे सादर करु शकते. हा आयपीओ सादर झाला तर सर्वात मोठ्या मूल्याचा आयपीओ ठरु शकतो.
अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घसरणीचा कल पहावयास मिळाला होता. हे लक्षात घेऊन रिलायन्स कंपनीने आयपीओ सादरीकरणाबाबतची प्रक्रिया लांबविली होती.
सर्वाधिक मूल्याचा आयपीओ
गुंतवणूक फर्म जेफरीज यांनी मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जिओचे मूल्य अंदाजे 180 अब्ज डॉलर्सचे म्हणजेच 16 लाख कोटी रुपयांचे म्हटले होते. परंतु आता काही बँकर्सनी आयपीओचे मूल्य 22 लाख कोटी रुपयांवर असल्याचे म्हटले आहे. या मूल्यानुसार पाहता जिओचा आयपीओ हा भारतातला सर्वाधिक मूल्याचा ठरु शकतो.
गेल्या सहा वर्षांमध्ये रिलायन्स जीओने केकेआर, सिल्वर लेक व गुगल या सारख्या जागतिक गुंतवणूकदारांकडून निधी उभारलेला आहे. असं सांगितलं जातं की, या आयपीओच्या माध्यमातून बरेचसे विदेशी गुंतवणूकदार आपली हिस्सेदारी विक्री करून नफा कमावू शकतात आणि यातून बाहेर पडू शकतात.
मोठ्या बँकांचा मिळवणार सल्ला
रिलायन्सने मागच्या महिन्यात आयपीओच्या तयारीला औपचारिकदृष्ट्या वेग दिला आहे. यासाठी कोटक महिंद्रा कॅपिटल्स, मॉर्गन स्टॅनले, गोल्डमॅन सॅक्स, जेएम फायनाशियल, एचएसबीसी, बँक ऑफ अमेरिका आणि सिटी ग्रुप सारख्या 19 मोठ्या बँकांना सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे.